उत्तर मुंबई पियुष गोयल राखणार? एकतर्फी निवडणूक झाली चुरशीची

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील लढत ही कमालीची एकतर्फी असल्याची चर्चा होती. त्यामुळे पियुष गोयल हा गड सहज राखतील अशी चिन्ह होती. पण शेवटच्या क्षणाला इथली लढत आता चुरशीची झालेली दिसते.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ हा भाजपचा गड समजला जातो. गुजराती-मराठी मतदारांचे प्राबल्य असलेला हा मतदार संघ आहे. या मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते राम नाईक यांनी सलग पाच वेळा विजय मिळवला होता. यावेळी भाजपने या मतदार संघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसला या मतदार संघात उमेदवार शोधावा लागला. शेवटी भूषण पाटील यांना काँग्रेसने बोहल्यावर चढवले. या मतदार संघातली लढत ही कमालीची एकतर्फी असल्याची चर्चा होती. त्यामुळे पियुष गोयल हा गड सहज राखतील अशी चिन्ह होती. पण शेवटच्या क्षणाला इथली लढत आता चुरशीची झालेली दिसते. 

मतदानाचा टक्का घसरला 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात एकूण 57.02 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का घसरलेला दिसतो. उत्तर मुंबईतल्या सहाही विधानसभा मतदार संघात हा टक्का घसरलेला आहे. त्यातही बोरीवली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजेच 62.50 टक्के मतदान झाले आहे. गेल्या वर्षी हेच मतदान 66.22 टक्के होते. गुजराती बहुल मतदार संघ असूनही इथे यावेळी मतांचा टक्का घटला आहे. विशेष म्हणजे उत्तर मुंबई लोकसभेत पाच मतदार संघात महायुतीचे आमदार आहे. एकाच ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे. मात्र या सर्व विधानसभा मतदार संघात जास्तीत जास्त मतदान करून घेण्यास तिथले आमदार कुठेतरी कमी पडले आहेत. सर्वात कमी मतदान हे मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघात 53.52 टक्के येवढे झाले आहे. इथे काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहे. दहिसर, मागाठाणे, चारकोप, कांदीवली पूर्व या मतदार संघातही मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे हा घसरलेला टक्की कोणाच्या विजयावर आणि पराभवावर परिणाम करणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

Advertisement


  
प्रचारातला मुद्दा काय? 

उत्तर मुंबई मतदार संघ हा तसा गुजराती बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो. शिवाय काही पट्ट्यात मराठी, उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांचाही इथे प्रभाव आहे. त्यामुळे या मतदार संघात मराठी विरुद्ध गुजराथी हा मुद्दाही चर्चीला जात होता. पियुष गोयल हे जरी इथे उमेदवार असले तरी मोदींच्या चेहऱ्यावर इथे मते मागितली गेली. विकासाचा मुद्दा आणि मोदी शहा गुजरात कनेक्शन याची किनार प्रचारात दिसून आली. तर काँग्रेसनं मराठी उमेदवार दिल्याने शिवसेना ठाकरे गटानेही त्यांना चांगली साथ दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दहिसर असेल मागठाणे असेल या मराठी पट्ट्यातून महाविकास आघाडीला साथ मिळाल्याची चर्चा आहे. सर्व सामान्य कार्यकर्ता की हायप्रोफाईल नेता? हा ही प्रचारातला मुद्दा राहीला आहे. स्थानिक उमेदवार विरूद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दाही प्रचारात होता. गोयल हे नेहमी दिल्लीत असतात त्यांचा मतदार संघाची माहित नाही. लोकसंपर्क नाही असाही प्रचार केला गेला.   

Advertisement

कोणाची मतं निर्णायक ठरणार? 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मते ही मराठी मतदारांची आहे. एकूण 32 टक्के मतेही मराठी मतदारांची आहेत. त्या खालोखाल 28 टक्के मतेही गुजराती मतदारांची आहेत. या खालोखाल उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. म्हणूनच या  निवडणुकीत गुजराती विरुद्ध मराठी असा रंग या निवडणुकीला आहे. पियुष गोयल हे गुजराती आहेत. तर काँग्रेसचे भूषण पाटील हे मराठी आहे. मात्र त्यांची पत्नीही गुजराती आहेत. शिवाय या समाजात त्यांची चांगली उठबस आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपला शिवसेना ठाकरेंची साथ होती. ती यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणार आहे. सहा विधानसभा मतदार संघा पैकी पाच ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार आहेत. त्यातले चार हे भाजपचे आहेत. तर एक शिवसेना शिंदे गटाचा आहे. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदार संघातले अनेक नेते हे ठाकरें बरोबर आहेत. त्यामुळे त्याची भरपाई भाजप कशी करते याबाबतही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी कापून गोयल यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांचेही कार्यकर्ते नाराज आहेत. शेट्टी यांची बोरीवलीवर चांगली पकड आहे. अशा वेळी त्यांची भूमीकाही महत्वाची ठरणार आहे. या सर्व गोष्टी पाहात कमालीची एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली.   

Advertisement

मतदार संघाचा इतिहास काय? 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ काही अपवाद वगळता भाजपचाच बालेकिल्ला राहीला आहे. 1989 पासून 2004 पर्यंत सलग पाच वेळा हा बालेकिल्ला राम नाईक यांनी अभेद्य ठेवला होता. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्याला काँग्रेसने खिंडार पाडले. अभिनेता गोविंदाने राम नाईक यांचा धक्कादायक पराभव केला. पंचवीस वर्षानंतर काँग्रेसने इथे विजय मिळवला. त्यानंतर 2009 सालीही राम नाईक यांना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. इथं नाईक यांचा संजय निरुपम यांनी निसटत्या फरकाने पराभव केला. मात्र 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये गोपाळ शेट्टी यांनी हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे खेचून आणत रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद केली.   


उत्तर मुंबईतले विधानसभा मतदार संघ 

बोरीवली विधानसभा मतदारसंघ
दहिसर विधानसभा मतदारसंघ
मागाठणे विधानसभा मतदारसंघ
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ
चारकोप विधानसभा मतदारसंघ
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ