भाजप खासदार सासऱ्यावर सुनेचे गंभीर आरोप, निवडणुकीच्या तोंडावर अडचण वाढणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अशातच वर्ध्यात खासदार सासऱ्यावर थेट सुनेने गंभीर आरोप केल्यानं तिथलंही वातावरण भलतच तापले आहे. हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून भाजप खासदार रामदास तडस हे आहेत. तडस यांची सुन पूजा तडस यांनी सासऱ्यांसह पतीवरही गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमिवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तडस यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे. तर तडस यांनी सुनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

'रॉडने मारले, घरातून काढले, बाळाचा DNA'
पूजा तडस यांनी सासरे खासदार रामदास तडस आणि पती पंकज तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंकज तडस यांनी बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी आपल्या बरोबर लग्न केले असा आरोप पूजा यांनी केलाय. त्यानंतर एका फ्लॅटवर आपल्याला टाकून देण्यात आले. त्यानंतर बाळ झालं. पण हे बाळ कोणाचं आहे अशी विचारणा करण्यात आली. डीएनए टेस्ट कर असेही सांगण्यात आले. घरी गेली असता रॉडने मारण्यात आले. ज्या फ्लॅटवर राहात होती तो विकून बेघर करण्यात आले असे एका मागोमाग एक गंभीर आरोप पूजा यांनी केले आहेत. 

तडस यांच्या विरोधात पूजा निवडणुकीच्या मैदानात 
आपल्याला न्याय मिळावा यासाठी वर्धा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असल्याचंही पूजा यांनी सांगितलं. त्यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जनतेमध्ये जावून आपल्यावर झालेला अन्याय सांगणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

रामदास तडस यांनी आरोप फेटाळले 
दरम्यान रामदास तडस यांनी पूजा यांचे आरोप फेटाळले आहेत. माझा मुलाचा माझाशी संबध नाही. मी त्याला बेदखल केला आहे. त्याने लग्न केले त्याचीही माझाकडे माहिती नाही अशी प्रतिक्रीया रामदास तडस यांनी दिली आहे. शिवाय निवडणूका आल्याकी असे आरोप केले जातात असेही ते म्हणाले. पैशासाठी मला ब्लॅकमेल करण्यात आले. पण मी पैसे दिले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण काढलं गेलं असेही ते म्हणाले. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने मला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण काढल्याचा रामदास तडस यांनी आरोप ही केला. 

Advertisement

'तडस यांची उमेदवारी रद्द करा' 
वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. मोदींनी पूजाला न्याय मिळवून द्यावा असंही त्या म्हणाल्या. पूजा तडस यांच्यासाठी आपण लढू असंही त्या म्हणाल्या. नागपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्याही उपस्थित होत्या.