अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढणार याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत. तर अमेठीतून के. एल. शर्मा हे निवडणूक रिंगणात असतील. काँग्रेसने या दोघांच्या उमेदवारीची घोषणा आज केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपल्या सर्वाधिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार राहुल गांधी अमेठी ऐवजी रायबरेली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तर अमेठीतून गांधी घराण्याचे एकनिष्ठ समजले जाणारे के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांची लढत या मतदार संघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबर होईल.
रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबातील कोणीतरी निवडणूक लढेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रियांका गांधी यावेळी पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरतील अशीही चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवण्याचे टाळले आहे. त्या ऐवजी राहुल गांधी यांनी आपला मतदार संघ बदलत अमेठी ऐवजी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. रायबरेलीतून भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीतून स्मृती इराणी मैदानात आहेत. अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदार संघ गांधी कुटुंबाचे गड मानले जातात. मात्र मागिल निवडणुकीत अमेठीमध्ये काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला होता. पाचव्या टप्प्यात 20 मे ला मतदान होणार आहे.