सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर झाली आहे. मतदानानंतर लोकांमध्ये सातारा लोकसभेमधून कोण जिंकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशा वेळी खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामार्ग लगतच लावलेल्या या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यापासूनच मोठी चुरस निर्माण झाली होती. मुळातच महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेचे उमेदवारी दिली. त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. जिल्ह्यातील हे दोन्ही उमेदवार एकास एक असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
हेही वाचा - दहावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे पाहू शकता निकाल?
अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र या परिस्थितीत खंडाळा तालुक्यात महामार्गा लगत शशिकांत शिंदे यांचा खासदारपदी विजयी झाल्याचे अभिनंदन पर बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने त्यांनी निकालापूर्वीच हे बॅनर लावलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ व त्यांच्या सहकार्यांनी हे बॅनर झळकवले आहेत.
हेही वाचा - एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल
त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच सातारावाशीयांचे लक्ष वेधले जात आहे. लोकसभा निकालाला अजून दहा दिवसांचा अवधी असतानाचा लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच खंडाळ्यात विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या तालुक्यात हाच विषय लक्षवेधक ठरत आहे.