Modi 3.0: एकही खासदार नाही, तरीही सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, 'लकी' रामदास आठवले

विशेष म्हणजे रामदास आठवले यांच्याकडे एकही खासदार नाही. अशा स्थितीतही त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. हिच खरी त्यांची ताकद असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

रामदास आठवले आरपीआयचे अध्यक्ष आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मोदी यांच्या या आधीच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा त्यांचा मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली होती. यावेळी मात्र त्यांना बढती मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे रामदास आठवले यांच्याकडे एकही खासदार नाही. अशा स्थितीतही त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. हिच खरी त्यांची ताकद असल्याचे बोलले जात आहे. 

छोट्या गावातून राजकारणाची सुरूवात 

दलित पँथरमुळे आठवलेंची चर्चा संपुर्ण राज्यात झाली. सांगली सारख्या छोट्याश्या धालेवाडीत आठवलेंचा जन्म झाला होता.  प्राथमिक शिक्षक तासगावात तर माध्यमिक शिक्षण सांगलीत झाले होते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई गाठत सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याच वेळी त्यांनी दलित पॅन्थरमध्ये राजा ढाले आणि  नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केलं. याच काळात ते राज्यातील घराघरात पोहोचले. ज्या ठिकाणी दलितांवर अन्याय होत त्या ठिकाणी आठवले आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचत असे. दलित पँन्थरची त्यावेळी एक वेगळी ताकद आणि दहशत होती. त्यामध्ये आठवलेंची भूमीका ही महत्वाची होती. आठवलेंचा एक वेगळाच दरारा त्यावेळी पाहायला मिळाला.  

Advertisement

महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम 

रामदास आठवलेंची वाढणारी ताकद आणि दलित समाजात त्यांची लोकप्रियता वाढत होती. या गोष्टी लक्षात घेता त्यांना त्यावेळी शरद पवारांनी मंत्रीमंडळात घेतले होते. त्याच काळात मराठवाडा विद्यापिठ नामांतर प्रकरण गाजले होते. अशा वेळी रामदास आठवले यांना विधान परिषदेवर घेवून त्यांना सामाजिक न्याय मंत्री बनवण्यात आले होते. काँग्रेसच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 

Advertisement

दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री 

रामदास आठवले यांनी राज्याच्या राजकारणात दबदवा निर्माण केला होता. आरपीआयच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी ताकद राज्यात निर्माण केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. 1996 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. ईशान्य मुंबई लोकसभेतून ते उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. पण पहिल्या प्रयत्नात त्यांना परभवाचा सामना करावा लागला. 1998 साली ते पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी मतदार संघ बदलला. शिवाय काँग्रेस आघाडीकडून ते आरपीआयचे उमेदवार होते. त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतून ही निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नारायण आठवलेंचा त्यांनी पराभव करत थेट लोकसभा गाठली. पुढे काँग्रेसमध्ये फुट पडली. आठवलेंनी शरद पवारां बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते 1999 आणि 2004 ची लोकसभा निवडणूक लढले. पंढरपूर लोकसभा मतदार संघातून विजय मिळवत हॅट्रीक केली. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभेतून त्यांना पराभव झाला.  

Advertisement

पवारांची साथ सोडली शिवसेनेबरोबर युती 

लोकसभेत झालेला पराभव रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेने बरोबर युती करत शिवशक्ती भीमशक्ती अशी साद दिली. आठवले, ठाकरे मुंडे एकत्र आले. राज्यात त्यांना एटीएम म्हणून संबोधले जावू लागले. आठवलेंच्या युतीतील प्रवेशाचा फायदा शिवसेने बरोबर भाजपलाही झाला. महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढली. पुढे 2014 ला आठवलेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले. पुन्हा एकदा आठवलेंची दिल्लीत एन्ट्री झाली. 

मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान 

केंद्रात 2014 साली मोदींचे सरकार आले. या सरकारमध्ये रामदास आठवले यांना राज्यमंत्री बनवले गेले. त्यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे 2019 लाही मोदी सरकार केंद्रात आले. त्या मंत्रीमंडळातही रामदास आठवले होते. आता आठवले मंत्रीपदाची हॅटट्रिक करणार आहेत.