लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास पाच दिवस शिल्लक राहिले असतानाही नाशिक, ठाणे, पालघर आणि मुंबईतील दोन जागांवरुन महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळू शकते. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र मुलाविरोधात निवडणूक न लढवण्याचा पवित्रा घेतल्यानंतर गजानन कीर्तिकर यांचं नाव मागे पडलं. आता या जागेवरुन रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जात असतं. साधारण दोन महिन्यांपूर्वी रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे अनेकांना धक्का बसला होता.
नक्की वाचा - नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट
रवींद्र वायकरांची ईडी चौकशी...
गेल्या काही दिवसांपासून कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या प्रकरणात त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल झाला होता. जोगेश्वरीमधील राखीव भूखंडावर आधी क्लब आणि नंतर हॉटेलचे बांधकाम करून त्यांनी वायकरांनी पैशांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात होता.
शिवसेना विरूद्ध शिवसेना
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळू शकते. उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांच्याविरोधात अमोल कीर्तिकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे.