राष्ट्रीय जनता दलचे (RJD) सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांची स्टाईल वेगळी आहे. ते राजकारणामुळे नाही तर राजकीय स्टेजवरील रागामुळे अनेकदा चर्चेत असतात. पाटलीपूत्र मतदारसंघात ( Patlipura Seat) सोमवारी याचं पुन्हा दर्शन घडलं. मोठी बहीण (Misa Bharti) यांनी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत देखील तेज प्रताप चांगलेच संतापलेले दिसले. यादव परिवार आणि पक्षाला त्यामुळे नामुश्की सहन करावी लागली. तेज प्रताप यादव स्टेजवरच पक्षाच्या कार्यकर्त्याला भिडले. त्यांनी कार्यकर्त्यावर हात उगारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तेज प्रताप यांच्या मोठ्या बहीण आणि पाटलीपूत्र लोकसभा मतदारसंघातील RJD उमेदवार मिसा भारती यांनी सोमवारी अर्ज भरला. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी देखील यावेळी उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पटनामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्टेजवर मिसा भारती, राबडी देवी आणि तेज प्रताप यादव यांच्यासह काही नेते आणि कार्यकर्ते स्टेजवर उपस्थित होते. स्टेजवर गर्दी झाल्यानं उभं राहण्यासाठी जागा कमी होती, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या गर्दीमध्येच तेज प्रताप एका कार्यकर्त्यावर संतापले. त्यांनी त्याच्यावर हात उगारला. मिसा भारती यांनी तेज प्रताप यांना शांत करण्याचा बराच प्रयत्न केला. पण, त्यांनी ऐकलं नाही. तेज प्रताप यांनी रागात या कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं. या गोंधळात त्यांच्या आई राबडीदेवी आणि बहीण मिसा भारती स्टेजवर आल्या. त्यांनी लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिसा भारती आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रयत्नांनी तेजप्रताप यांना समाजवलं.
( नक्की वाचा : ओवैसी विरुद्ध लढणाऱ्या माधवी लता यांनी हटवला महिला मतदारांच्या चेहऱ्यावरचा बुरखा, Video )
पाटलीपूत्र मतदारसंघात मिसा भारती यांचा सामना भाजपाच्या रामकृपाल यादव यांच्याशी होत आहे. रामकृपाल यादव भाजपापूर्वी राष्ट्रीय जनता दलमध्ये होते. 2014 साली पाटीलपूत्रमध्ये पक्षानं मिसा भारती यांना उमेदवारी दिल्यानं रामकृपाल यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मिसा भारती यांचा पराभव केला आहे.