सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. त्यामुळे या मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर इच्छुक असलेले विशाल पाटील नाराज झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सांगली काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेनाच लढवणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर विशाल पाटील यांचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले. त्यांनी सांगलीतील काँग्रेसच्या फलकावरील काँग्रेस हेच नाव पुसून टाकत आपला निषेध नोंदवला. नंतर पक्षानेही मिरज काँग्रेस कमिटीही बरखास्त केली. मात्र त्यानंतर विशाल पाटलांच्या एका कृतीनं त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.
विशाल पाटील यांनी काय केलं?
संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस नावाचे अक्षर रंग लावून पुसलं होतं. मात्र काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी काँग्रेस कमिटीला नवीन फलक तयार करून लावला. माझ्यावर जरी अन्याय झाला असं वाटत असलं तरी काँग्रेस पक्षाने यापूर्वी माझ्या कुटुंबीयांना भरपूर दिलं आहे. उमेदवारी मिळवण्यात आम्ही कुठे कमी पडलो असेल, तर आमच्यावर राग काढा मात्र काँग्रेस पक्षावर राग व्यक्त करू नका, असे आवाहन विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या आवाहानामुळे कार्यकर्ते आवाक झाले आहेत. त्यांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचे कौतूकही होत आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले बंडखोरी केलेले नेते या निवडणूकीत पाहीले. पण विशाल पाटील यांच्या या एका भूमिकेमुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकली.
सांगलीत भाजप विरूद्ध सेना लढत
सांगली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. विशाल पाटील यांनी सध्या तरी कोणती भूमिका जाहीर केलेली नाही. ते वंचितच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा म्हणून विश्वजित कदम आग्रही होते. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीही गाठली होती. पण त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.
काँग्रेसची काय निर्णय घेणार?
हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. अशा वेळी ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार की नाही याची सांगलीत चर्चा सुरू आहे. आघाडीचा धर्म पाळावा असे शिवसेनेकडून सांगितले जाते. मात्र काँग्रेस कार्यकर्ते अजूनही थांबा आणि पाहा या भूमिकेत आहेत.