सातारा लोकसभेची जागा कोणाला सुटणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. असं असलं तरी उदयनराजे भोसले यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सातारा म्हणलं की दोन राजेंची नाव पुढे येतात. ती म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले. सध्या दोघेही भाजपमध्ये आहेत. उदयनराजे खासदार आहेत तर शिवेंद्रराजे आमदार. आता उदयनराजे हे लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र या दोघांचं नातं म्हणजे विळ्या भोपळ्याचं... पण आता चित्र बदलतय. पक्षाच्या जाहीर मेळाव्यातच त्याची प्रचेती आली.
उदयनराजेंनी घेतली शपथ
साताऱ्यात महायुतीच्या मेळाल्याचा धडाका सुरू आहे. त्यातील एक मेळावा हा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रे येथे झाला. यावेळी उदयनराजेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आम्ही दोघेही आता एकत्र आल्याचे सांगितले. यापुढच्या काळात आमदारकी खासदारकीच्या निवडणूकीत आम्ही एकत्र असू असेही सांगितले. ऐवढच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणूकीत आम्ही एकत्र राहणार आहोत अशी हमीही दिली. मात्र त्यावेळी बसलेल्या कार्यकर्त्यापैकी एकाने महाराज तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगा असा आग्रह केला. उदयनराजेंनी काही सेकंद पॉज घेऊन छत्रपती शिवरायांची शपत घेत आम्ही सर्व निवडणूकीत एकत्र असू असे सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
उदयनराजे लोकसभेसाठी इच्छुक
सातारा लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबत अजूनही निर्णय झाला नाही. या जागेसाठी भाजप बरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटही आग्रही आहे. त्यामुळे याजागेचा अजूनही तोडगा निघालेला नाही. असं असलं तरी उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केलेली आहे. त्याचा भाग म्हणून संपुर्ण मतदार संघात मेळाव्यांना सुरूवात झालेली आहे. यामध्ये उदयनराजेंना शिवेंद्रराजेंची साथ मिळत आहेत. तसे पाहाता हे दोघेही एकमेकाला शह देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे दोनही राजे एकत्र आल्याचं चित्र आहे.
शरद पवार गटाचा उमेदवार कोण?
सातारा लोकसभामतदार संघ महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पारड्यात पडला आहे. मात्र इथून अजूनही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार कळवला होता. त्यामुळे पवारांना नवा चेहरा द्यावा लागणार आहे. शशिकांत शिंदेंच्या नावाची सध्या चर्चा सुरूआहे. मात्र असं असलं तरी त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून उमेदवार ठरल्यानंतर पवार गट आपला उमेदवार जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.