सांगली लोकसभेची जागा आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जरी गेली असेल तरी काँग्रेस नेत्यांची समजूत काढण्यास ठाकरे गटाला यश आलेले नाहीत. दुसरीकडे काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी आज (मंगळवारी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्यासाठी मदन भाऊ युवा मंच मैदानात उतरला आहे. आज सांगलीच्या गणपती मंदिरापासून पदयात्रा काढत ते उमेदवारी दाखल करतील. विशेष म्हणजे ही रॅली काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून सुरू होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
विशाल पाटील उमेदवारी दाखल करणार
काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यासाठी मदन भाऊ युवा मंच मैदानात उतरला आहे. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवाय भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देत थेट विशाल पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचे बळ वाढले आहे. मात्र आज ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार की काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रहार पाटील उमेदवारीवर ठाम
एकीकडे विशाल पाटील उमेदवारी दाखल करणार हे निश्चित आहे. त्यात शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हेही आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. आज जर तुम्हाला माझी अडचण वाटत असेल, तर मी जाहीरपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार असल्याचं चंद्रहार पाटील म्हणाले. 'मात्र शेतकऱ्याचा मुलगा लोकसभेच्या निवडणुकीसाठी लायक नाही, माझ्या पाठीमागे कोणता कारखाना नाही, माझे वडील, आजोबा कोणी मुख्यमंत्री नव्हते, माझे वडील आमदार-खासदार नव्हते म्हणून मला उमेदवारी दिली जाणार नाही, असं काँग्रेसने जाहीर करावं. काँग्रेसने असं केलं तर जाहीरपणे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, अशा शब्दात चंद्रहार पाटलांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
आघाडीत बिघाडी होणार?
विशाल पाटील यांची समजूत काढण्यास शिवसेनेचे नेते कमी पडल्याचे दिसून येते. शिवाय काँग्रेसच्या वरिष्ठांनाही पाटील यांची समजूत काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या निमित्ताने आघाडीत बिघाडी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी या आधीच सांगलीत काँग्रेसने शिवसेनेचे काम करावे असं सांगितलं आहे. पण त्याकडे जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. अशा स्थिती सांगलीवरून आघाडीत मिठाचा खडा पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
कोण कोण उमेदवारी अर्ज दखल करणार?
दरम्यान राज्यभरात आज वेगवेगळ्या मतदार संघात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, माढ्यातून धैर्यशिल मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरमधून राम सातपूते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.