नितीन गडकरी भाजपचे जेष्ठ आणि वजनदार नेते. मोदी सरकारमध्ये ते तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतील. नितीन गडकरी यांनी भारतीय युवा मोर्चापासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहीले नाही. भारतीय युवा मोर्चा ते केंद्रीय मंत्री असा त्यांना थक्का करणारा प्रवास राहीला आहे. विशेष म्हणजे गडकरींचे भाजप बरोबरच विरोधीपक्षातही चांगले संबध आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी रस्ते विकास मंत्री म्हणून देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदी सर्वात पहिले कोणाचे नाव आले असेल तर ते नितीन गडकरी यांचेच होते.
नितीन गडकरी यांची कारकीर्द
नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय जिवनाची सुरूवात भारतीय युवा मोर्चापासून केली होती. 1989 मध्ये पहिल्यांदा त्यांनी नागपूर पदविधरमधून विधान परिषदेची निवडणूक लढवली. त्यानंतर ते या जागेवर सतत निवडून आले. महाराष्ट्रात युतीचे सरकार आले त्यावेळी गडकरींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून संधी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात मुंबई पुणे एक्सप्रेस वेची निर्मिती झाली होती. शिवाय त्यांच्या कार्यकाळात 55 उड्डाणपुल बांधले गेले. पुढे युतीची सत्ता महाराष्ट्रातून गेली. मात्र गडकरींना पक्षाने विधान परिषदेत विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी दिली. गडकरी हे 2009 पर्यंत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते होते. गडकरींनी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी स्विकारली होती.
गडकरींची केंद्रात एन्ट्री
मनमोहन सिंह पंतप्रधान होते. काँग्रेसची देशात मोठी ताकद होती. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसने केंद्रात बाजी मारली होती. त्याच काळात नितीन गडकरी यांना भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे ते दुसरे मराठी नेते होते. पक्षा संघटन मजबूत करण्यावर त्यावेळी गडकरी यांनी अधिक भर दिला. केंद्रीय राजकारणात कमी वेळात त्यांनी दबबा निर्माण केला. मात्र त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असताना पुर्ती कंपनीच्या प्रकरणात त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र केंद्रातील गडकरींना आपले स्थान बळकट केले होते. त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार होती. तशी पक्षाने तरतूही केली होती पण त्यांना राजीनामा द्यावा लागला.
केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश
2014 साली केंद्रात सत्ताबदल झाले. काँग्रेसचे सरकार जावून त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. या सरकारमध्ये नितीन गडकरींना मंत्री म्हणून संधी देण्यात आली. मोदींनंतर सर्वात जेष्ठ मंत्री म्हणून तेच होते. त्यांच्याकडे देशाच्या रस्ते विकास मंत्रीमंडळाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी पहिल्या पाच वर्षात देशात रस्त्याचे जाळ निर्माण केले. देशातल्या दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या. त्यांच्या कामाची स्तुती विरोधकांनीही केली. 2019 साली पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकारचे कमबॅक झाले. या मंत्रीमंडळातही गडकरींना महत्वाचे स्थान देण्यात आले. त्यांच्याकडील रस्ते विकास मंत्रालय कायम ठेवण्यात आले. आता तिसऱ्यांदा मोदी सरकार येत आहे. यात ही गडकरी मंत्री होणार आहेत. मंत्री म्हणून शपथ घेण्याची ते हॅट्रीक करणार आहेत. महाराष्ट्राचा दिल्लीतला हक्काचा चेहरा म्हणून गडकरींकडे पाहीले जाते.
मुख्यमंत्रीपदाची आली होती संधी
2014 साली केंद्रात मोदी सरकार आले. पुढे चार महिन्यात राज्यातही निवडणूका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पंधरा वर्षाची काँग्रेसची राज्यातली सत्ता गेली. भाजप कधी नव्हे तो राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. भाजपकडे कोणताही आश्वासक चेहरा राज्यात नव्हता. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपने कोणालाही महाराष्ट्रात पुढे केले नव्हते. अन्य राज्यात भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करतो. पण महाराष्ट्रात तसे झाले नव्हते. अशा वेळी नितीन गडकरींचे नाव समोर आले होते. पण त्यांनी मुंख्यमंत्री म्हणून राज्यात परतण्या पेक्षा केंद्रातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
नागपुरातून सलग तिसऱ्यांदा विजयी
नागपूर लोकसभा मतदार संघातून नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. नागपूर हा काँग्रेसचा गड होता. त्याला गडकरींनी खिंडार पाडत तो 2014 साली भाजपकडे खेचून आणला. त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी या मतदार संघातून विजय मिळवला आहे. तीनही वेळा त्यांनी लाखा पेक्षा जास्त मताधिक्य मिळावले. नागपुरकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.