लोकसभा निवडणुकीतचे पाच टप्पे पुर्ण झाले आहे. आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जूला लागेल. त्या आधी कोण बाजी मारणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर काही राजकीय विश्लेषक आपले अंदाजही व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची NDTV समुहाचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाला काय असेल यावर भाष्य केले आहे. शिवाय विरोधी पक्षाबाबतही आपली मतं मांडली आहे. केंद्रात कोणाचे सरकार येईल याचेही भाकीत केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रात कोणाची सत्ता येणार?
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. सध्याची स्थिती पाहाता निकाल काय लागेल असा प्रश्न NDTV समुहाचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी प्रशांत किशोर यांना केला. याला उत्तर देताना त्यांनी केंद्रात सरकार हे भाजप प्रणित एनडीएचे येईल हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 साली जेवढ्या जागा भाजप आणि एनडीएने जिंकल्या आहेत तेवढ्याच जागा कायम राहातील. एखाद्या वेळेस त्यापेक्षा थोड्या जास्त जागाही जिंकतील असेही ते म्हणाले. त्यामुळे भाजपचे केंद्रात सरकार बनवणे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची NDTV नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी घेतलेली सर्वात 'प्रभावी' मुलाखत | UNCUT
भाजपच्या जागा कमी होतील का?
देशात सध्याच्या स्थिती लोकांमध्ये काही गोष्टींसाठी नाराजी आहे. पण मोठ्या प्रमाणात असंतोष आहे अशी स्थिती नाही. शिवाय दुसरं कोणी आलं तर परिस्थिती सुधारेल, म्हणजे राहुल गांधी आले तर परिस्थिती सुधारेल अशी ही भावना जनतेत नाही. असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की आकड्यांचा विचार करता देशातल्या जवळपास सव्वा तिनशे जागा अशा आहेत ज्यावर भाजप आणि एनडीएची स्थिती मजबूत आहे. त्यातील नव्वद टक्के जागा ते पुन्हा मिळवतील. पण सव्वा दोनशे जागा अशा आहेत ज्या ठिकाणी भाजपचे प्रदर्शनहे हे चांगले झालेले नाही असेही ते म्हणाले. असं असलं तरी पश्चिम आणि पुर्व भारतात भाजपला नुकसान होताना दिसत नाही. उलट पुर्व आणि दक्षिण भारतात भाजपच्या मतांचा टक्का वाढताना दिसत आहे. शिवाय या भागात जागाही मिळतील असेही ते म्हणाले. खास करून ओडीसा, तेलंगणा, आसाम, बिहार, तामिळनाडू, केरळ या राज्यात भाजपला फायदा होईल असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. यामुळेच भाजपच्या जागा वाढतील पण कमी होणार नाहीत असे ते म्हणाले.
भाजपची रणनिती फायदेशीर ठरणार
भाजप सरकार बनवणार यात कोणतीही रिस्क दिसत नाही असे प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. भाजपने जरी 400 पारचा नारा दिला असला तरी त्या पेक्षा कमी जागा आल्यातरी ते सरकार बनवणार नाहीत असे होणार नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. ज्याच्या 272 जागा येणार तो सरकार बनवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपचे पुन्हा एकदा सरकार येताना दिसत आहे. 2014 साले जे अंदाज बांधले गेले होते त्याच्या अगदी विरूद्ध निकाल आले होते. 2019 साली पण तेच झाले होते. मागील वेळी काय झाले त्याचाही आपण विचार करत असतो. तसं पाहीले तर 2014 पुर्वी सहसा कोणालाही बहुमत मिळाले नव्हते. आता 2024 ची स्थिती वेगळी आहे. सध्या 400 पारची चर्चा सुरू आहे. त्यामुळे 272 हा विषयच नाही. भाजपने जी घोषणा दिली आहे, त्यानुसार भाजपच्या 370 की 400 जागा येणार याचीच चर्चा सर्वत्र आहे. भाजपच्या या रणनितीचे कौतूक करावे लागेल असेही प्रशांत किशोर म्हणाले.
विरोधकांची भूमिका या निवडणुकीत कशी होती?
विरोधकांची या निवडणुकीत भूमिका कशी होती या प्रश्नालाही प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले. देशातील 60 टक्के लोक हे दिवसाला 100 रूपयेही कमवत नाही. याचा अर्थ असा होतो की ते खुश नाहीत. सर्वांचाच विकास झालेला आहे असेही नाही. त्यामुळे नारीजी ही आहेच हे नाकारता येणार नाही. आतापर्यंत कोणत्याही पक्षाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन सत्ता मिळवता आलेली नाही. विरोधातच आतापर्यंत जास्त मते मिळाली आहेत. आपल्या घटनेनुसार ज्याला जास्त मत त्याचे सरकार बनते. त्यामुळे देशात विरोधक आहेत. ते राहाणार. ते कमजोर होणार नाहीत असे प्रशांत किशोर म्हणाले. शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. मोदी सरकारला शेती कायदे मागे घ्यावे लागले. देशात बेरोजगारी, असमानता हे मुद्दे आहेतच. ते मुद्दे सरकारसाठी डोकेदुखीच्या ठरू शकतात असे ही प्रशांत किशोर यांनी सांगितले.
इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी अजून चांगली बनू शकली असती. ही आघाडी बनत असताना कार्यकर्त्यामध्ये सुरूवातील उत्साह होता. एक मजबूत विरोधकांची आघाडी होत आहे असा मेसेजही गेला असे प्रशांत किशोर म्हणाले. मात्र या आघाडीकडून पुढे काहीच कार्यक्रम देण्यात आला नाही. जागावाटपही वेळेवर झाले नाही. आघाडी होत होती त्यावेळी काही राज्याच्या निवडणुका होत्या. या निवडणुका आपण जिंकू असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीकडे तेवढेसे लक्ष दिले नाही. इथेच गेम फसल्याचे प्रशांत किशोर सांगतात. या काळात भाजपने त्या राज्यातल्या निवडणुका तर जिंकल्याच पण जोरदार मुसंडीही मारली. त्यानंतर राम मंदिर आलं. त्यावेळी तर विरोधकांनी हत्यारचं टाकली होती. पण जनतेत नाराजी आहे हे विरोधकांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खुप उशिर झाला होता असेही ते म्हणाले.
'...पण समोर कोण आहे?'
काँग्रेसला भाजप आणि मोदींना बॅकफूटवर ढकलण्याची गेल्या दहा वर्षात तिन वेळा संधी आली होती. पण त्या संधीचे काँग्रेसाला सोने करता आले नाही. शिवाय या निवडणुकीत नाराजी नाही असे नाही. पण नाराजांनाही प्रश्न आहे तो म्हणजे मोदींच्या विरोधातील चेहरा कोण? या प्रश्नाचे उत्तर त्यांना अजूनीही मिळालेले नाही. आम्ही नाराज आहोत पण दुसरा पर्याय काय? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधकांकडून कोणताही चेहरा नाही याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असे ते म्हणाले.
'यापुढे बिहारसाठी काम करणार'
पुढची दहा वर्ष बिहारसाठी काम करणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने बिहारमध्ये फिरत आहे. आता पर्यंत 4800 गावांना भेटी दिल्या आहेत. लोकांबरोबर चर्चा केली आहे. बिहार हे एक मागास राज्य आहे. इथं गरीब मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही स्थिती बदलली पाहीजे हे आपले मत असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. सध्याच्या स्थितीला राज्यकर्त्यांना, नेत्यांना जबाबदार धरण्यास काही अर्थ नाही. त्यासाठी जनतेत परिवर्तन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. याआधी नेत्यांना मार्गदर्शन करत होतो आता बिहारच्या जनतेला ते करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रात दहा वर्षे काम केले. त्यानंतर निवडणूक रणनितीकार म्हणून दहा वर्षे काम केले. आता बिहारसाठी पुढील दहा वर्षे काम करणार आहे असेही ते म्हणाले. पुढच्या दहा वर्षात बिहारला विकसीत राज्यात आणणार असेही त्यांनी सांगितले.