- राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी होती
- जिल्हा परिषदेसाठी ७३१ जागा आणि पंचायत समितीसाठी १४६२ जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत
- धाराशीव जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ९६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
ZP Election: नगरपालिका, महापालिकानंतर आता राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 21 जानेवारी ही शेवटची तारीख होती. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी तब्बल 7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी 13023 असे रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. 12 जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होत आहेत. या जांगासाठी पाच फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज हे धाराशीवमध्ये दाखल झाले आहेत. इथं जिल्हापरिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सुमारे 967 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. धाराशीव पाठोपाठ कोल्हापूरात दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 907 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 853 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झाले आहेत. इथं 56 जागांसाठी 226 उमेदवारी अर्ज आले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणुकासाठी ही उमेदवारी अर्जांचा जणू पाऊस पडला आहे. 1462 जागांसाठी तब्बल 13023 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज हे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी आले आहेत. जिल्ह्यात पंचायत समितीच्या 136 जागांसाठई तब्बल 1529 अर्ज आले आहेत. तर कोल्हापूर नंतर पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी आले आहेत. पुणे जिल्ह्यात पंचायत समितीच्या 146 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यासाठी जवळपास 1482 अर्ज दाखल झाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर आहे. इथल्या 126 जागांसाठी तब्बल 1456 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यातल्या बारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अनेक वर्षांनी या निवडणूका होत आहेत. त्यामुळे इच्छुकांनी ही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. अधिकृत उमेदवारी न मिळालेले आणि गेली काही वर्षे मतदार संघात काम करणारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांचा जणू पाऊस पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे.