- चित्रपट 3 इडियट्सच्या सिक्वेलची घोषणा झाली असून ही कथा मूळ चित्रपटानंतर 20 वर्षांनी सुरू होणार आहे
- सिक्वेलमध्ये रँचो, राजू आणि फरहान यांची 20 वर्षानंतरची स्थिती दाखवणार आहेत
- 2009 मध्ये प्रदर्शित 3 इडियट्स चित्रपटाने जागतिक स्तरावर 400 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला कमावला होता
भारतीय चित्रपट इतिहास गाजलेला चित्रपट म्हणून '3 इडियट्स' या चित्रपटाकडे पाहीले जाते. रँचो, राजू आणि फरहानने या चित्रपटातून रसिकांवर आपली जादू केली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाली आहे. त्यानंतर हा पिक्चरबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या कथानकाबाबत अत्यंत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. या सिक्वेलमध्ये मूळ चित्रपटातील लोकप्रिय पात्रे तब्बल 20 वर्षांच्या 'टाइम लीप'नंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
राजकुमार हिराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, '3 इडियट्स 2' ची कथा ही पहिल्या भागाच्या पुढील प्रवासावर आधारित असणार आहे. हे सर्व जुने मित्र आता कॉलेजचे तरुण राहीलेले नाहीत. ते आता आपल्या आयुष्यात 20 वर्षे पुढे गेले आहेत. ते आपापल्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहेत. ते तिथे स्थिर झाले आहेत. शिवाय ते विवाहित ही आहेत. त्यांना मुलं झाली आहेत. अशा एका नव्या वळणावर त्यांची जीवनशैली कशी बदलली आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकला जाईल असं राजकुमार हिराणी यांनी सांगितलं आहे.
2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या '3 इडियट्स' चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर खान आणि बोमन इराणी यांनी प्रमुख भूमीका केल्या होत्या. त्यांनी आपल्या भूमीकांची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली होती. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. जागतिक स्तरावर 400 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला कमावण्यात या चित्रपटाला यश आलं होतं. या चित्रपटाने चीनमध्ये 'अवतार'सारख्या चित्रपटालाही मागे टाकले होते. त्यावरून हा किती मोठा ब्लॉक बस्टर होता याचा अंदाज येतो.
हिराणी आता 'प्रीतम अँड पेड्रो' या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहेत. ही सीरिज 3 जुलै रोजी जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते. यावेळी त्यांना बऱ्याच जणांनी थ्री इडियट्स बाबतच अधिक विचारले. 'ऑल इज वेल'चा नारा देत अवघ्या जगाला वेड लावणाऱ्या '3 इडियट्स 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याबाबतचे काही हिंट्स देण्यात आल्या आहेत. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जुन्या आठवणींसह एक नवा कौटुंबिक ड्रामा पाहायला मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world