'द काश्मिर फाईल्स'मध्ये फारूख मल्लिक बिट्टा या खलनायकाची भूमिका साकारणारा, मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशा विविध पातळीवरील काम पाहणारा हरहुन्नरी कलाकार चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुलाच्या नावावर होणारं ट्रोलिंग, पत्नीविषयी वापरली जाणारी अश्लाघ्य भाषा यावरुन चिन्मयने हा निर्णय घेतल्याचं त्यानेच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं.
चिन्मय मांडलेकरला त्याचा मुलगा जहांगिर याच्या नावावरून ट्रोल केलं जात आहे. याबाबत त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकर हिने एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र त्यानंतरही त्याच्याविरोधात होणारं ट्रोलिंग सुरूच आहे. शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्याने आपल्या मुलाचं नाव जहांगिर का ठेवलं, यावरुन ट्रोल केलं जात असल्याचं चिन्मयने सांगितलं. त्यामुळे यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय चिन्मयने घेतला आहे.
हे ही वाचा-अंत्यसंस्कार, तेराव्यात जाण्याचेही घेतात पैसे; अभिनेत्याकडून बॉलिवूडचं डार्क सिक्रेट उघड
ट्रोलिंगबाबत चिन्मय म्हणाला, माझ्या मुलाचं नाव जहांगिर ठेवल्याने मला ट्रोल केलं जात आहे. माझ्या अभिनयाबद्दल तुम्ही बोलू शकता. मात्र माझ्या पत्नी आणि मुलाला सोशल मीडियामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगिर का, असा त्या ट्रोलिंगचा सूर आहे.
माझ्या मुलाचा जन्म 2013 मध्ये झाला. आता तो 11 वर्षांचा आहे. मात्र तेव्हा हे ट्रोलिंग झालं नव्हतं, ते आता होतंय. माझं शिवाजी महाराजांचा प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या भूमिकेनं मला आतापर्यंत खूप दिलं. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोकांनीही माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मात्र आता मी नम्रतापूर्वक सांगतो की, यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही. मला याचं वाईट वाटतंय.
मात्र माझ्या मुलाचं नाव खटकत असेल तर जहांगिर आर्ट गॅलरीचं नावही बदलणार का? भारतरत्न जहांगिर रतनजी दादाभाई टाटा म्हणजे जेआरडी टाटा यांनी उभी केलेली एअर इंडियामधून प्रवास करणार नाही का? टायटनचं घड्याळ, टाटाची वाहनं, टाटांच्या कंपनीत काम करणाऱ्यांचं काय? याचा विचार आपण करतो का? असा सवाल चिन्मय मांडलेकरने उपस्थित केला.