Ketaki Chitle on Marathi : सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी केतकी चितळे पुन्हा एकदा बरळली आहे. मराठी-हिंदी भाषेवरून सुरु असलेल्या वादात तिने उडी घेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य करत अनेकांचा रोष तिने पत्करला आहे. मराठी बोललं नाही तर भोकं पडणार आहेत का? असा सवाल करत तिने अनेकांना डिवचलं आहे.
केतकी चितळेने थेट सवाल केला आहे की, "मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?" तिच्या या विधानानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. "लोक यातून आपली असुरक्षितता दाखवत आहेत. मराठीतच बोल. मराठी कसं येत नाही, असा दबाव टाकला जात आहे.
समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही. समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का? असा थेट सवाल केतकी चितळेने केला आहे. तसेच, "समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का? मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही," असेही केतकी चितळेनं म्हटलंय.
२०२४ मध्ये मराठी, बंगाली आणि आसामी भाषांना अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषांनाही केतकी चितळेने विरोध दर्शवला आहे. जर असा दर्जा द्यायचा असेल, तर तो सर्व भाषांना दिला जावा, असे तिचे मत आहे. अभिजात दर्जाची इच्छा ही असुरक्षिततेतून येते. हिंदी आणि उर्दू या भाषांनाही अभिजात दर्जा मिळालेला नाही, पण त्यासाठी कोणी लढतही नाही. अभिजात दर्जा मिळाल्याने काहीही बदलत नाही, उलट असुरक्षितता वाढते, असं केतकीचं मत आहे.