Shweta Shinde :'मग तू काय करणार?' लग्नासाठी मुलांकडून 2BHK ची मागणी करणाऱ्या लग्नाळू मुलींना अभिनेत्रीने झापलं

आजकाल मुला-मुलींना लग्न ठरविण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर बोट ठेवत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिनेती आणि निर्माती श्वेता शिंदे हिने एका मुलाखतीदरम्यान असं काही वक्तव्य केलं की अख्खं सोशल मीडिया तिच्या पाठीशी उभं राहिलं आहे. श्वेता शिंदेंने लग्न व्यवस्थेबाबत सध्या निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर बोट ठेवलं आणि लग्नाळू मुलींसह त्यांच्या आई-वडिलांचीही कानउघडणी केली.

काय म्हणाली श्वेता शिंदे?

आजकाल मुला-मुलींना लग्न ठरविण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. मुलीच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मुलाकडे २ बीएचके हवा अशी त्या मागणी करतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एखाद्या मुलाकडे फ्लॅट कसा असेल? ही त्याच्या करिअरची सुरुवात असते. मग मुलाच्या आई-वडिलांनी मुलाच्या नावावर फ्लॅट बुक करायचा. मग कुठली तरी मुलगी त्याला लग्नाला होकार देणार. मला हे समीकरणच कळत नाहीये. मग मुलगी काय करणार? जर मुलीला सर्व काही ताटात वाढूनच हवं असेल तर लग्न कशाला करायचं. आपण संसार करण्यासाठी लग्न करतो. एकत्र मिळून घर खरेदी करा. एकमेकांना साथ द्या. आणि मग त्या नव्या घराच्या वास्तूशांतीच्या पुजेला एकत्र जोडीने बसा. त्यात खरी मज्जा आहे. 

घराची अपेक्षा करण्यापेक्षा चांगल्या मुलाची अपेक्षा करा...

श्वेता शिंदे पुढे म्हणाली, मुलीच्या आई-वडिलांनी आधी स्वत:ला हा प्रश्न करायचा हवा, की वयाच्या पंचवीशीत त्यांच्याकडे तरी स्वत:चं घर होतं का? कार होती का? मूळ मुद्दा म्हणजे तुमच्या मुलीला जे काही मिळणार आहे ते त्या मुलीचं किंवा मुलाने कर्तृत्वावर कमावलेलं नाहीये. कारण मुलाच्या आई-वडिलांनी ते खरेदी केलं आहे. त्यामुळे लग्नासाठी टूबीएचकेची अपेक्षा करण्यापेक्षा एक सज्जन, निर्व्यसनी, चांगला पैसा कमावण्याची क्षमता असणारा नवरा हवा अशी अपेक्षा करायला हवी.

Advertisement

श्वेताच्या या व्हिडिओवर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी तिच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तर काहींनी लग्न हे काही एकमेव ध्येय नसल्याचं म्हटलं आहे.