Aishwarya Rai Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील पॉवरफुल जोडी गेल्या काही काळापासून सातत्यानं चर्चेत आहे. हे दोघं लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या आहेत. त्यानंतर काही कार्यक्रमात ते एकत्र दिसल्यानं त्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट झालं. पण, त्याबाबत या दोघांपैकी कुणीही जाहीर वक्तव्य केलं नव्हतं. आता अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच या विषयावर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर याबाबत आजवर जाहीर वक्तव्य का दिलं नाही, याचं कारणही त्यानं सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला अभिषेक बच्चन?
अभिषेक बच्चननं ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'यापूर्वी माझ्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. आज माझे एक कुटुंब आहे आणि हे खूप त्रासदायक आहे.
मी काही स्पष्टीकरण दिले तरी लोक ते फिरवून सांगतील, कारण नकारात्मक बातम्या विकल्या जातात. तुम्ही मी नाही आहात. तुम्ही माझे आयुष्य जगत नाही. तुम्ही त्या लोकांना जबाबदार नाही. त्यांना मी जबाबदार आहे.'
( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
अभिषेकनं सांगितला किस्सा
अभिषेक बच्चननं या मुलाखतीमध्ये एक किस्ता सांगितला. ज्यात एका ट्रोलने त्याच्या एका पोस्टवर खूप आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावर त्याचे मित्र सिकंदर खेर इतके संतापले की त्यांनी सार्वजनिकरित्या आपला पत्ता पोस्ट करून आणि ट्रोलला त्यांच्यासमोर हे बोलण्याचे आव्हान दिले.
'कंप्यूटर स्क्रीनच्या मागे अज्ञातपणे बसून सर्वात वाईट गोष्टी लिहिणे खूप सोयीचे आहे. तुम्हाला कळते की तुम्ही एखाद्याला दुखवत आहात. ते कितीही मजबूत असले तरी, याचा त्यांच्यावर परिणाम होतो. जर कोणी तुमच्यासोबत असे केले तर तुम्हाला कसे वाटेल?', असे अभिषेक म्हणाला.
ऑनलाइन द्वेष पसरवणाऱ्यांना सार्वजनिकरित्या त्यांचा सामना करण्याचे आव्हान अभिषेकनं दिले. 'तुम्ही इंटरनेटवर काही बोलणार असाल, तर मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्ही माझ्यासमोर येऊन मला सांगा. त्या व्यक्तीमध्ये स्पष्टपणे कधीही माझ्यासमोर येऊन हे बोलण्याची हिंमत नसेल. कुणी माझ्यासमोर येऊन काही बोलले, तर मला वाटेल की त्याच्यामध्ये दृढ विश्वास आहे. मी त्याचा आदर करेन.'
अभिषेक बच्चन लवकरच मधुमिता दिग्दर्शित 'कालीधर लापता' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यात दैविक भागेला आणि जीशान अयुब देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 4 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल.