- ऐश्वर्या राय बच्चन यांनी रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधले आहे
- तिने आई आणि पत्नी म्हणून आपली खरी ओळख मानली असून करिअरमधून घेतलेल्या ब्रेकवर स्पष्ट भूमिका मांडली आहे
- मुलाखतीत तिने आई झाल्यानंतर असुरक्षिततेची भावना कधीच न वाटल्याचे सांगितले
जागतिक स्तरावर आपल्या सौंदर्याची मोहोर उमटवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2025' मुळे चर्चेत आहे. या महोत्सवात तिने आपल्या आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधलेच, पण एका मुलाखतीत तिने लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर करिअरमधून घेतलेल्या ब्रेकवर दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. "आई असणे हीच माझी खरी ओळख आहे," असे म्हणत तिने आपल्या प्राधान्यक्रमाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रतिक्रीया ही उमटल्या आहेत.
पुढे ती म्हणाली की आपल्यात असुरक्षिततेची भावना कधीच नव्हती. 'द हॉलिवूड रिपोर्टर'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याला विचारण्यात आले की, आई झाल्यानंतर मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यामुळे तिला कधी असुरक्षित (Insecure) वाटले का? त्यावर तिने अत्यंत संयतपणे उत्तर दिले. ती म्हणाली की, मुलगी आराध्या आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यात ती प्रचंड आनंदी आहे. तिच्यासाठी पत्नी आणि आई म्हणून जबाबदारी निभावणे हीच सर्वात मोठी ओळख आहे. तिच्या या भूमीकेचं तिच्या चाहत्यांनी कौतूक केलं आहे.
ऐश्वर्याने केवळ वैयक्तिक आयुष्यच नाही, तर तिच्या व्यावसायिक निर्णयांवरही भाष्य केले. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मोठ्या व्यावसायिक लाँचची अपेक्षा असताना तिने 'इरुवर'सारख्या वेगळ्या चित्रपटाची निवड केली होती. त्यानंतर 'देवदास' आणि 'चोखेर बाली' सारखे चित्रपट करून तिने आपली क्षमता सिद्ध केली. आपल्या प्रत्येक निर्णयाचा तिला सार्थ अभिमान असल्याचे तिने यावेळी नमूद केले.
आपल्या करिअरचा आढावा घेताना ऐश्वर्याने सांगितले की, तिने नेहमीच आव्हानात्मक चित्रपटांची निवड केली आहे. मणिरत्नम यांच्या 'इरुवर'पासून सुरू झालेला तिचा प्रवास हा नेहमीच चौकटीबाहेरचा राहिला आहे. आजही ती आपल्या भूमिकेबाबत तितकीच सजग आहे. जेव्हा तिला एखादी सशक्त पटकथा मिळेल, तेव्हाच ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसेल, असे संकेतही तिने दिले आहेत. त्यामुळे आता ती मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना निश्चितच आहे.