Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एका वेबसाइटने कोणत्याही परवानगीशिवाय आपले फोटो आणि एआय-जनरेटेड फोटो वापरून त्यांचे प्रॉडक्ट्स विकले, ज्यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे, असा आरोप ऐश्वर्या रायने केला आहे. हे कृत्य कायद्याचे उल्लंघन असल्याचंही त्यांनी या याचिकेत स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
ऐश्वर्या राय यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी सांगितले की, अभिनेत्रीला आपली प्रसिद्धी आणि वैयक्तिक अधिकार जपायचे आहेत. काही पूर्णपणे काल्पनिक आणि अश्लील फोटो इंटरनेटवर अपलोड केले जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर आपण प्रतिवाद्यांना इशारा देणारा एक अंतरिम आदेश देऊ असे न्यायमूर्ती तेजस करिया यांनी तोंडी सूचित केले आहे.
( नक्की वाचा : माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्याचं ‘इमोशनल' कनेक्शन; अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी सांगितला खास किस्सा, Video )
ऐश्वर्या राय यांचे वकील सेठी यांनी युक्तिवाद केला की, "आरोपींना त्यांची (ऐश्वर्या राय यांची) प्रतिमा, व्यक्तिमत्व किंवा चेहरा वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. एक व्यक्ती केवळ माझ्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करून पैसे कमवत आहे. त्यांचे नाव आणि व्यक्तिमत्व कोणाच्याही लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरले जात आहे. हे खूप दुर्दैवी आहे."
ऐश्वर्या राय यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांमध्ये प्रवीण आनंद आणि ध्रुव आनंद यांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी ही केस 7 नोव्हेंबर रोजी संयुक्त रजिस्ट्रारसमोर आणि 15 जानेवारी 2026 रोजी न्यायालयासमोर निश्चित केली आहे.