
The Story Behind Madhuri Dixit's Iconic Sailab Song : 'सैलाब' चित्रपटातील ‘हमको आजकल है इंतजार' हे गाणे माधुरी दीक्षितच्या करिअरमधील एक सुपरहिट गाणे आहे. आजही अनेक ठिकाणी हे गाणं हमखास वाजवले जाते. कोळीच्या वेषात बेधुंद होऊन नाचणारी माधुरी प्रेक्षकांना जाम आवडली होती. त्यामुळेच हा चित्रपट फारसा लक्षात नसला तर गाणे सर्वांच्या लक्षात आहे. किंबहूना या गाण्यामुळेच 'सैलाब' चित्रपटाला ओळख मिळाली. या गाण्याच्या मेकिंगमागे एक खास गोष्ट दडली आहे. याबाबत मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये हा किस्सा सांगितला आहे. 'सैलाब' चे दिग्दर्शक दीपक विज हे किशोरी शहाणे यांचे पती आहेत.
'डॉक्टरांना हृदय नसतं का?'
किशोरी शहाणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, लोक दीपक यांना विचारत होते की एका डॉक्टरच्या भूमिकेतील नायिका कोळी गाण्यावर का नाचत आहे. त्यावर दीपक विज यांनी, 'डॉक्टरांना हृदय नसतं का?' असं उत्तर दिलं होतं.
( नक्की वाचा : मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का )
या गाण्याच्या शूटिंगच्या दिवशी, नटराज स्टुडिओमध्ये एक धूळ खात पडलेली क्रेन दीपक विज यांच्या नजरेस पडली. चौकशी केल्यावर एका जुन्या तंत्रज्ञाने त्यांना सांगितले की ही क्रेन गुरुदत्त यांची असून ते त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमी तिचा वापर करत असत. गुरुदत्त यांचे मोठे चाहते आणि त्यांच्या चित्रपटांचे विद्यार्थी असलेल्या दीपक विज यांनी तात्काळ आपल्या कॅमेरामॅनला ती क्रेन वापरण्यास सांगितली, जेणेकरून गाण्याला गुरुदत्त यांचा आशीर्वाद मिळेल. या क्रेनचा वापर करून दीपक विज यांनी या गाण्याचे अनेक अप्रतिम शॉट्स घेतले.
किशोरी शहाणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केलाय. त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world