AR Rahman - Saira Banu Divorce : संगीतकार एआर रहमानचं 29 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं आहे. 57 वर्षांचा रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानू यांनी घटस्फोट घेतल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. जवळपास तीन दशकांचा त्यांचा संसार मोडल्यानं संगीत तसंच मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रे डायव्होर्स (Grey Divorce) या घटस्फोटाच्या प्रकाराची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?
लग्नानंतर घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांच्या वयोगटात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या बदलाला 'ग्रे डिव्होर्स' असं नाव देण्यात आलंय. हा आता सोशल मीडियावरील ट्रेंडिंग शब्द राहिलेला नाही. या प्रकारातील जोडपी लग्नानंतर बराच काळ एकत्र घालवल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. वयाच्या चाळीशी किंवा पन्नाशीनंतर मनाविरुद्ध जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा वेगळं होण्याचा निर्णय ही जोडपी घेतात.
हा शब्द प्रामुख्यानं ग्रे केसांशी संबंधित आहे. या वयातील व्यक्तींच्या सामान्यपणे हा केसांचा रंग असतो. त्या रंगापासून 'ग्रे डिव्होर्स' हा शब्द प्रचलित झाला आहे. अमेरिकेत 2004 साली हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला. त्यानंतर जगभर या प्रकारच्या घटस्फोटांचा ट्रेंड वाढत आहे.
( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
काय आहेत ग्रे डिव्होर्सची कारणं?
समान उद्देश संपणे : मुलं मोठी झाल्यानंतर शिक्षण, करिअर किंवा अन्य कारणांसाठी घर सोडून जातात त्यावेळी आपला समान उद्देश संपल्याची भावना जोडप्यामध्ये निर्माण होते. त्यामधून ते वेगळं होण्याचा विचार करु लागतात.
आर्थिक कारण : नवरा-बायकोमध्ये आर्थिक कारणांमुळे एकमत नसणे हे देखील तणावाचं एक कारण असू शकतं. अनेकदा त्यांच्यात आर्थिक कारणांमुळे मतभेद असतात. विशेषत: दोघांमधील एकच व्यक्ती कमावत असेल आणि तोच सर्व आर्थिक निर्णय घेत असेल तर नात्यामध्ये असंतुलन आणि नाराजी निर्माण होते.
निवृत्ती : निवृत्तीनंतर जोडपी अधिक काळ एकत्र घालवतात. सतत एकत्र राहण्यानं त्यांच्यामधील मतभेद आणखी वाढतात. निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं? यावर त्यांच्यात सहमती होत नाही.
( नक्की वाचा : ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार? )
धोका : जोडीदारापैकी एकाचं विवाहबाह्य प्रेमप्रकरण असेल तर धोका दुसऱ्या व्यक्तीला सहन होत नाही. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात मुलं किंवा अन्य जबाबदारीमुळे या विषयावर समोरच्याला सुधारण्याची संधी दिली जाते. पण, वयाच्या या टप्प्यात सर्व मार्ग संपल्यानं घटस्फोट हाच पर्याय शिल्लक राहतो.
आर्थिक स्वातंत्र्य : सध्याच्या काळात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीनं कमावत आहेत. योग्य प्रकारे अर्थार्जन करण्याची आणि स्वत:च्या तत्वांवर आयुष्य जगणं शक्य असेल तर महिला असमाधानकारक विवाहातून बाहेर पडण्याचा मार्ग स्विकारतात.
घटस्फोटाला मान्यता : आपला समाजात आता घटस्फोटाला मान्यता मिळू लागली आहे. सामाजिक दडपण कमी झाल्यानं आता जोडपी सहज घटस्फोट घेऊ लागली आहेत.
कोणत्या सेलिब्रेटिंनी घेतलाय ग्रे डिव्होर्स?
हिंदी चित्रपटसृष्टीत ग्रे डिव्होर्स हा नवा प्रकार नाही. एआर रहमानपूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक किरण राव यांनी 15 वर्षांच्या संसारानंतर 2021 साली ग्रे डिव्होर्स घेतला होता.
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया हे 21 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळे झाले. अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांनीही 20 वर्ष वैवाहिक आयुष्य एकत्र घालवल्यानंतर घटस्फोट घेतला.