Renowned Urdu poet Bashir Badr Passes Away : प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने लाखो चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांना आधुनिक गझलचं उस्ताद मानलं जात होतं. साहित्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं.
बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्यात झाला. त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून पदवीचं शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. तेथे ते बराच काळ उर्दूचे प्राध्यापक म्हणून मुलांना मार्गदर्शन करीत होते. बद्र हे अत्यंत सरळ, रुमानी आणि सोप्या भाषेत प्रभावीपणे गझल लिखण्यासाठी ओळखले जात होते. बशीर बद्र यांची शायरी अत्यंत सहज आहे. त्यांनी आपल्या शायरीत दैनंदिन जीवनातील शब्द अत्यंत सुरेख पद्धतीने गुंफले आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इमकान, आहटे, कुल्लियात-ए-बशीर बद्र आणि उजाले अपनी यादो के यांचा समावेश आहे.
एकेकाळी दंगलीत घर जळालं...
उर्दू शायरीच्या माध्यमातून प्रेमावर बोलणारे बशीर बद्र यांना १९८७ मध्ये मेरळमध्ये सांप्रदायिक दंगलीत द्वेषाचा सामना करावा लागला होता. या दंगलीत त्यांचं घर जळालं होतं. या दुर्घटनेत त्यांची अनेक ऐतिहासिक अप्रकाशित रचना आणि कविता कायमची जळून नष्ट झाली होती. या घटनेनंतर ते भोपाळला शिफ्ट झाले.
इंदिरा गांधींनी जुल्फिकार भुट्टो यांना ऐकवली बशीर बद्रांची कहाणी...
बशीर बद्र यांनी भारताच्या फाळणीच्या वेळेसही अनेक शायरी लिहिल्या आहेत. शिमला करारादरम्यान तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या जुल्फिकार अली भुट्टो यांना बशीर बद्र यांची फाळणीदरम्यान लिहिलेला शेर ऐकवला होता.
हा शेर असा होता...
"दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त बन जाएं तो शर्मिन्दा ना हों."
बशीर बद्र यांचे प्रसिद्ध शेर...
मुसाफिर हैं हम भी मुसाफ़िर हो तुम भी
किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी
ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है,
ज़मीं पांव फैलाऊं तो दीवार में सर लगता है
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,
न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए
सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा,
इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जाएगा
कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से,
ये नए मिज़ाज का शहर है ज़रा फासले से मिला करो
दुश्मनों के साथ भी मेरे ताल्लुक अच्छे हैं,
मेरी फितरत में नफरत का कोई काम नहीं