मराठी बोलायला भूमी पेडणेकरला का वाटते भीती? इंटरनेटवरील 'त्या' प्रकारावर अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता

Bhumi Pednekar News: एनडीटीव्ही मराठी मंचच्या विशेष कार्यक्रमात अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या 11 वर्षांच्या अभिनय प्रवासावर, बॉलिवूडमधील पारंपरिक ढाच्यांवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील महिलांच्या भूमिकेवर उघडपणे भाष्य केले आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Bhumi Pednekar News: पारंपरिक साचा मोडीत काढत भूमी पेडणेकरने कसं मिळवलं यश?"
NDTV Marathi

- ऋतुजा कदम/ मयुर बोरसे

Bhumi Pednekar News: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. कोणत्याही सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये स्वतःचे अढळ स्थान कसे निर्माण केले, यावर तिने अत्यंत मनमोकळेपणे भाष्य केले. "मी अशा भूमिकांची निवड केली नाही, तर खरं तर त्या भूमिकांनीच मला निवडलंय," अशा शब्दांत तिने आपल्या अभिनय प्रवासाचे गुपित उलगडले.

सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसणे आणि सिनेमांची निवड | Background and Film Selection

भूमी पेडणेकर म्हणाली की, जेव्हा तुम्ही सिनेमसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येता, तेव्हा तुमचा पहिला सिनेमा तुम्हाला निवडतो; तुमच्याकडे कोणतीही निवड नसते. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझा पहिला सिनेमा 'दम लगा के हईशा' होता. या सिनेमाने मला एक मोठी गोष्ट समजावली की, जर तुम्ही चांगल्या कॉन्टेंटच्या आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कथांच्या मागे धावाल, तर तुम्ही इंडस्ट्रीत स्वतःची हक्काची जागा नक्कीच तयार करू शकाल. 'टॉयलेट एक प्रेमकथा' असो किंवा माझा शेवटचा शो 'दलदल', मी नेहमीच माझ्या भूमिकांमधून भारतीय नारीचे वेगवेगळ्या पद्धतीचे पैलू जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

कोरोनानंतर बदललेले सिनेसृष्टीचे जग आणि ओटीटीचा वाढता प्रभाव | Post-Pandemic Cinema and OTT Shift

गेल्या 11 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भूमीने कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरच्या सिनेसृष्टीतील बदलांवर चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, कोरोनापूर्वीच्या काळात थिएटर्समध्ये महिलांची अतिशय प्रभावी आणि अप्रतिम पात्रे पाहायला मिळत होती आणि त्याबद्दल मी खूप आशावादी होते. पण कोरोनानंतर थिएटर्समध्ये महिला प्रधान भूमिका खूप कमी होत (shrink) गेल्या आहेत. कमर्शियली मोठ्या ठरलेल्या सिनेमांमध्ये महिलांच्या प्रभावी भूमिका बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. थिएटर्समध्ये ही संख्या घटत असली, तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र महिलांचे नेतृत्व करणाऱ्या अनेक कथा पाहायला मिळत आहेत आणि तिथे महिलांची संख्या वाढतेय.

समाजात 'फिमेल फर्स्ट' कथांची का आहे गरज? | Need for Female-First Stories

निर्मात्यांना आता कळलं पाहिजे की देशातील 50 टक्के लोकसंख्या महिलांची आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. आजच्या जगात जिथे पाहावे तिथे जीव गमावल्याच्या बातम्या येत आहेत आणि मानवी सहानुभूती (empathy) संपत चालली आहे, तिथे 'फिमेल फर्स्ट' कथांची अत्यंत गरज आहे. कारण या कथा समाजातील संवेदनशीलता, दयाळूपणा आणि स्त्रीची खरी ताकद वेगवेगळ्या रूपांत समोर आणतात, असे मत भूमीने मांडले.

अपयश हाच मोठा गुरू; बॉलिवूडचे मोडीत काढलेले ढाचे| Failure as a Teacher and Motivation

आपल्या संघर्षावर बोलताना भूमी म्हणाली की, अभिनेत्री होणे हे माझे स्वप्न होते आणि आज मला जे आवडते तेच रोज करायला मिळतेय, याबद्दल मी स्वतःला नशीबवान मानते. तुमचा सर्वात मोठा शिक्षक हा तुमचे अपयश असते. मी माझ्या प्रवासात यश आणि अपयश दोन्ही पाहिले आहे, पण अपयशाने मी कधी निराश झाले नाही. मी एक 'सेल्फ मेड' महिला आहे, जिने स्वतःचा प्रवास स्वतः ठरवला आहे. माझ्याकडे दुसरा कोणताही 'प्लॅन बी' नव्हता, त्यामुळे 'लढत राहा आणि पुढे वाढत राहा' हाच एक मार्ग माझ्याकडे होता. माझ्या घरातले मी बॉलिवूडमध्ये येण्याने खूश नव्हते. बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्रीचा एक ठरलेला पारंपरिक साचा होता आणि मी त्यात कुठेच फीट बसत नव्हते. पण देवाने माझ्याकडे अशा स्क्रिप्ट पाठवल्या, ज्यांनी बॉलिवूडचे आजवरचे सर्व जुने ढाचे मोडीत काढले. स्वतःवर विश्वास ठेवा, मॅनिफेस्ट करा आणि कठोर मेहनतीची तयारी ठेवा, असा सल्ला तिने दिला.

(नक्की वाचा : Radha Patil Exclusive: 'मी एकटीनेच बदल का करावा? लोकांनीच...' लावणी सादरीकरणाच्या वादावर राधा पाटीलचा थेट सवाल)

सोशल मीडिया कास्टिंग आणि ट्रोलिंगची भीती| Social Media and Casting Realities

सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येवरून आजकाल कलाकारांचे कास्टिंग केले जाते, हे वास्तव भूमीने मान्य केले. ट्रोलिंग आणि बुलिंग (दादागिरी) यामध्ये काहीही फरक नाही, असे सांगत तिने सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर आणि नकारात्मकतेवर भीती व्यक्त केली.

Advertisement

मराठी भाषेसोबतचे नाते आणि भीती|  Disconnection with Marathi Language

भूमीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक हळवी बाजूही इथे मांडली. ती म्हणाली, मी खूप लहान असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मराठी भाषेसोबत माझे काहीसे नाते चांगले तयार झाले नाही आणि कोणाशी संवाद साधता आला नाही. मला मराठी पूर्ण समजते, पण संवाद साधताना मी थोडी गोंधळते. आजकाल इंटरनेटचे जग कसे आहे तुम्हाला माहीतच आहे; मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा चुकीचा अर्थ काढून काहीतरी वेगळेच दाखवले जाते. सुरुवातीला ही गोष्ट सांगायला मला लाज वाटायची, पण आता मी जे सत्य आहे ते जगासमोर उघडपणे सांगते.

(नक्की वाचा :Radha Patil News: अश्लीलतेच्या आरोपांवर राधा पाटीलचे चोख उत्तर; म्हणाली, लोकांना जे आवडतेय तेच मी...)

देशसेवा आणि भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? |Social Service and Political Future

लहानपणापासून वडिलांसोबत नाश्ता करताना जनरल नॉलेजची टेस्ट असो किंवा देशात नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत करणे असो, समाजसेवेचे धडे घरातूनच मिळाले, असे भूमीने सांगितले. सिनेमा हे विचार बदलण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे आणि मनोरंजन करता करता जर लोकांचे विचार बदलता आले, तर तो परफेक्ट बॅलेन्स असतो. भविष्यात राजकारणात येणार का? यावर उत्तर देताना भूमी म्हणाली, माझ्या रक्तातच देशाची सेवा आहे. आता ती कोणत्याही माध्यमातून समोर येवो. मी सध्या माझ्या सिनेमांमधील कथांमधूनही तेच करण्याचे प्रयत्न करत आहे. भविष्यात जर देशासाठी आणि समाजासाठी अधिक खोलवर काम करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच विचार करेन, असे म्हणत तिने राजकारणातील प्रवेशाचे संकेत खुले ठेवले.

Advertisement

NDTV Marathi Manch LIVE | अभिनेत्री भूमी पेडणेकर LIVE | NDTV Marathi News LIVE