प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळे सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. तर, काही जणांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होत असते. अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. संजय दत्त हरियाणातील यमुनानगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत होतं. संजय दत्तनं स्वत: या सर्व विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला संजय?
संजय दत्तनं सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं नाव ट्विटर) वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यानं या सर्व बातम्या अफवा असल्याचं सांगितलं आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीय. राजकारणात प्रवेश करणार असेल तर स्वत: त्याबाबत घोषणा करेल. लोकांनी याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन संजय दत्तनं केलंय.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात काँग्रेस सेलिब्रिटीला मैदानात उतरवणार असल्याचं वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झालं होतं. काँग्रेस हायकमांडनं यासाठी संजय दत्तच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात होतं. संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेसचे खासदार तसंच डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तर त्याची बहिण प्रिया दत्तही यापूर्वी खासदार होत्या.
प्रकाश राज भाजपामध्ये प्रवेश करणार? 'सिंघम' अभिनेत्यानं सोशल मीडिया पोस्टला दिलं उत्तर
संजय दत्तचं हरियाणाशी जुनं कनेक्शन आहे. त्याचं वंशपरंपरागत घर हरियाणामधील यमुनानगरमध्ये आहे. इंडियन नॅशनल लोकदलचे नेते अभयसिंह चौटाला यांच्या प्रचारासाठीही संजय दत्त अनेकदा यापूर्वी हरियणामध्ये आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस वेणूगोपाल राव यांच्या उपस्थितीमध्ये संजय दत्तच्या नावाची चर्चा झाली होती. त्यांनी हरियणातील करनालसाठी संजयचं नाव निश्चित केलं होतं, अशीही चर्चा होती, पण या सर्व चर्चा निराधार असल्याचं संजयनं स्वत: स्पष्ट केलंय.