एखाद्या व्यक्तीचं नशीब कधी बदलेल, त्याला कधी ब्रेक मिळेल हे सांगता येत नाही. आज प्रसिद्धीची शिखरावर असलेल्या अनेक यशस्वी व्यक्तींचा भूतकाळ हा संघर्षाचा होता. त्यांनी आयुष्यात प्रचंड कष्ट करत प्रत्येक कसोटीवर स्वत:ला सिद्ध केलं आणि यश मिळवलं. चित्रपट कलाकारही याला अपवाद नाहीत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रगल्भ अभिनेत्रींमध्ये शबाना आझमींचा समावेश होतो. अभिनयाच्या शाळेत धडा गिरवत असलेल्या नवोदितांना त्यांचं उदाहरण दिलं जातं. शबाना आझमींचा जन्म हा प्रसिद्ध परिवारात झाला. त्यानंतरही त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
या संघर्षाच्या कालखंडातही त्यांनी हार मानली नाही. संधी मिळतातच स्वत:ला सिद्ध केलं. राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. इतकंच नाही तर भारत सरकारनं पद्मश्री आणि पद्मभूषण या दोन नागरी पुरस्कारानं त्यांचा गौरव केला.
दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न
उर्दू कवी कैफ आझमी हे शबाना यांचे वडील. तर शौकत आझमी त्यांच्या आई होत्या. शौकत यांनी ‘कैफ अँड मेमॉयर' या नावानं आत्मचरित्र लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी शबाना यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट केला आहे.
सुदैवानं एकदा त्यांच्या मैत्रिणीनं तर एकदा शाळेतील सुरक्षारक्षकानं शबाना यांचा जीव वाचवला.
शबाना आझमी यांनी त्यांच्या काही मुलाखतीमध्ये स्वत:ची लव्ह लाईफ आणि क्रश याबाबत माहिती दिलीय. ‘दिग्दर्शक शेखर कपूरसोबत रिलेशनमध्ये असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं. या दोघांमध्ये काही दिवसांनी ब्रेक अप झालं. त्यानंतरही त्यांनी एकत्र काम केलं.
शेखर कपूरशिवाय अभिनेते शशी कपूरही त्यांचे क्रश होते. त्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. जावेद अख्तर त्यांच्या कविता घेऊन शबाना यांचे वडील कैफ आझमींकडे येत असतं. जावेद विवाहीत असल्यानं या दोघांनी ब्रेक-अप करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो यशस्वी झाला नाही. अखेर जावेद यांनी घटस्फोट घेतल्यानंतर शबाना यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं.