मुंबई: सध्या चल हल्ला बोल हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्याने वाद निर्माण झाला असून हे प्रकरण सेन्सॉर बोर्डाकडे गेले आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाने कोण नामदेव ढसाळ? असा संतापजनक सवाल उपस्थित केला होता? त्यानंतर आता पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाने नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेन्सॉर बोर्डाकडून नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियाला कार्यालयात बोलावण्यात आले तसेच यावेळी त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नामदेव ढसाळ यांचे पुतणे स्वप्नील ढसाळ तसेच दलित पँथरच्या राष्ट्रीय महासचिव आणि नामदेव ढसाळ यांची पुतणी संगीता ढसाळ यांनीएक व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाकडून झालेला अपमानही कथन केला आहे.
सेन्सॉर बोर्डाने नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबाला कार्यालयामध्ये बोलावून घेतले. यावेळी त्यांना धमकावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आमचे फोन काढून घेतले. तसेच कोण नामदेव ढसाळ? तुम्ही त्यांचे कोण लागता? असे सवाल विचारले. आम्हाला बोलावले म्हणजे त्यांना माहिती होती, तरीही फक्त अपमान करण्यासाठी हे प्रश्न विचारल्याचे संगीता ढसाळ यांनी म्हटले आहे.
यावेळी तुम्ही मराठी दलित कधीपासून चित्रपट काढता? असा उर्मट सवालही अधिकाऱ्यांनी विचारला. घाटी मराठी को कौन पेहचानता है? एक तो मराठी उसमें भी दलित कोई क्यूँ पहचानेगा? असे संतप्त विधानही या अधिकाऱ्यांनी केले. त्यांना नामदेव ढसाळ यांच्यावर तर आक्षेप आहेच, पण मराठी भाषेवरही आहे. मराठी लोक काय करतील, अशी त्यांची भावना झाली आहे, अशा शब्दात संगीता ढसाळ यांनी संताप व्यक्त केला आहे.