मुंबई: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा अतुलनीय पराक्रम आणि शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. छावा चित्रपटाला शिवप्रेमींचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. एकीकडे या चित्रपटाचे तिकीट मिळवणे अवघड झाले असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने आपल्या मतदारसंघात छावाचे मोफत शो आयोजित केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या मतदार संघात छावा चित्रपटाचे मोफत आयोजन केले आहे. 24 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत दररोज 4 शो मोफत दाखवले जाणार आहेत. दुपारी 12, 3, 6 आणि 9 असे चार दिवसभरातील चार शो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहेत. आपल्या जवळच्या शाखेतून हे तिकीट मिळवता येणार असून जरीमरी येथील मॅक्सेस सिनेमागृहात हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
आजपासून चांदिवली विधानसभा क्षेत्रातील जनतेकरिता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित "छावा" हा चित्रपट 24 फेब्रुवारी ते 05 मार्च फेब्रुवारी रोजी दररोज 4 शो मध्ये माझ्या माध्यमातून मोफत दाखवण्यात येणार आहे तरी आपण मोफत पासेस साठी स्थानिक आपल्या जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क करा, असे आवाहन आमदार दिलीप लांडे यांनी केले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत असून संभाजीराजेंची भूमिका त्यांनी अक्षरशः जिवंत केल्याच्या प्रतिक्रिया शिवप्रेमी देत आहेत. चित्रपट पाहताना सिनेमागृहांमध्ये हर हर महादेवच्या घोषणा आणि शिवगर्जनांनी सिनेमागृहे दणाणून निघत आहेत.