अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला छावा (Chhava Movie) या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. शिवाजी सामंत यांनी लिहिलेल्या 'छावा' या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ज्या मराठी पुस्तकावर आधारित आहे त्याबद्दलही देशभर उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कादंबरीवर आधारित बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली चाळीस दशके मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कादंबरी त्यामुळे अमराठी वाचकांच्याही चर्चेचा विषय ठरली. आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा' कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी हे भाषांतर केले आहे.
‘छावा'च्या यशानंतर देशातील कानाकोपऱ्यातून आणि अगदी जगातील कोपऱ्यातूनही या कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली. मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केल्याने चित्रपटाचा मुहूर्त साधत ‘छावा'ची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले.
( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा )
शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी यापूर्वी सावंत यांच्या ‘युगंधर' कादंबरीचे भाषांतर केले आहे. हे भाषांतर वाचकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांनी ‘छावा' कादंबरीच्या भाषांतरास सुरुवात केली होती. ‘छावा' कादंबरीचे भाषांतर हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. कादंबरीतील अनेक प्रसंग वाचताना अंगावर शहारे येतात. त्यामुळे या कादंबरीचे भाषांतर करणे तितकेच भावनिक आणि आव्हानात्मकही होते, असे धारप यांनी स्पष्ट केले.
ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या दालनासोबतच सर्व ऑनलाइन पोर्टलवर विक्रीस उपलब्ध आहे. अनेक वितरकांनी पुस्तकाची आगाऊ नोंदणी केली आहे. एमेझॉनवर कादंबरी उपलब्ध होताच भरघोस प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. इंग्रजीतून मराठीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांना मोठी मागणी असते, पण ‘छावा' कादंबरीच्या भाषांतराने हे चित्र पालटले आहे. आणि प्रथमच एखाद्या मराठी पुस्तकाच्या भाषांतराला असा प्रतिसाद मिळत असल्याचेही माहिती मेहता यांनी दिली.
( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावरील शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपाला दिग्दर्शकांचं उत्तर, महत्त्वाच्या मुद्याकडं वेधलं लक्ष )
मागील महिन्याभरात कादंबरीची मागणी प्रचंड वाढल्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊसने या कादंबरीची पेपरबॅकमधील विशेष आवृत्तीही प्रकाशित केली आहे. याशिवाय हिंदी प्रकाशकांनीही विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यामुळे ‘छावा' कादंबरी वाचकांना आता विविध भाषांमध्ये नव्या ढंगात अनुभवायला मिळणार आहे.