- धर्मेंद्र यांनी सनी देओलसाठी मौसमी चॅटर्जी यांची केली होती मनधरणी
- ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना दिला उजाळा
- मुलगा सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले होते मौसमी चॅटर्जींच्या घरी
Dharmendra News: धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतील एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला होता. सिनेसृष्टीत तुम्हाला असे कित्येक कलाकार आढळतील, ज्यांच्याकडे धरमजींशी संबंधित आठवणींचा खजिना आहे. अलिकडेच ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या की, "मला आठवतंय की धर्मेंद्र यांचा मुलगा सनी, पहलाज (निहलानी) आणि कदाचित राजकुमार संतोषी घायल सिनेमा (1990) साइन करून घेण्यासाठी माझ्याकडे आले होते, पण मला कमी मानधन मिळत असल्याने चर्चा पुढे गेली नाही. सुरुवातीला पहलाज तणावात होते. त्यांचा अहंकार दुखावला गेलाय, असे मला वाटलं".
धर्मेंद्र पोहोचले मौसमी चॅटर्जींच्या घरी
मौसमी यांनी सांगितलं की तिसऱ्या दिवशी धरमजी घरी आले आणि म्हणाले, "मी हे माझ्या मुलासाठी करतोय. कोणतीही अभिनेत्री तुझ्याइतकी निष्पाप दिसत नाही... तुझ्यासोबत वाईट घडताना कोणीही जखमी (घायल) होईल".
पुढे त्या असंही म्हणाल्या की, धरमजींना माझ्या घरी पाहून माझ्या घरामध्ये काम करणाऱ्या बाईलाही धक्का बसला, कारण आमच्या घरामध्ये फिल्मी वातावरण नाहीय. त्यांच्या चांगुलपणाने मला हैराण केले होते कारण ते माझ्याकडे आपल्या मुलासाठी आले होते. मानधनाबाबतीतही माझं नुकसान होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली".
मौसमी चॅटर्जींनी धर्मेंद्र यांच्याकडे केली होती तक्रार
मौसमी यांनी पुढे असं सांगितलं की, घायल सिनेमाच्या सिल्व्हर जुबली कार्यक्रमात माझ्याव्यतिरिक्त सिनेमात काम करणाऱ्या सर्वांना ट्रॉफी देण्यात आली, याबाबतही मी त्यांच्याकडे वाईट पद्धतीने तक्रार केली होती. मला आठवतंय की ते निराश झाले होते.
धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 नोव्हेंबर रोजी डिस्चार्जही देण्यात आला आणि घरीच औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली, पण काही दिवसांतच धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला.