Sachin Pilgaonkar On Dharmendra: भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' म्हणून ओळख असलेले दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी (24 नोव्हेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहताना, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि धर्मेंद्र यांच्या नम्र स्वभावाचा एक अत्यंत खास किस्सा सांगितला आहे, ज्याचा संबंध थेट 'यमला पगला दीवाना' या गाजलेल्या चित्रपटाच्या शीर्षकाशी आहे.
सचिन पिळगावकर यांनी सांगितल्या आठवणी
धर्मेंद्र यांनी 1960 साली 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर 'शोले', 'मेरा गांव मेरा देश', 'बंदिनी', 'धरम-वीर' आणि 'अपने' अशा अनेक यशस्वी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपली अमिट छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत 'धरमजीं'ना श्रद्धांजली वाहिली. ई-टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या खास आठवणी कथन केल्या.
सचिन पिळगांवकर सांगतात की, 'धर्मेंद्र हे फक्त सर्वात देखणे अभिनेते नव्हते, तर मी भेटलेल्यांपैकी सर्वात नम्र व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.' सचिन आणि धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मझली दीदी' या चित्रपटात एकत्र काम केले. त्यावेळी सचिन यांचे वय केवळ नऊ वर्ष होते. या चित्रपटात सचिन यांनी मीना कुमारीजींच्या धाकट्या भावाची आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या पतीची भूमिका साकारली होती. सचिन यांनी यावेळी सांगितले की, सेटवर हा देखणा माणूस केवळ सहकलाकारांशीच नव्हे, तर सेटवरील प्रत्येक तंत्रज्ञाशीही अत्यंत सौम्य आणि आदराने बोलत असे.
कशी झाली मैत्री?
'मझली दीदी'नंतर सचिन पिळगांवकर यांनी 'रेशम की डोरी' (1974) मध्ये धर्मेंद्र यांची तारुण्यातील भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी 'शोले' मध्ये एकत्र काम केले. 'दिल का हीरा'मध्ये धर्मेंद्र कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते, तर सचिन त्यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होते. या चित्रपटांपर्यंत त्यांची मैत्री घट्ट झाली होती. पुढे त्यांनी 'क्रोधी' मध्येही काम केले. अनेक वर्षांनंतर, सचिन पिळगांवकर यांना 'आजमयिश' या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना दिग्दर्शित करण्याचा सन्मान मिळाला. सचिन यांच्यासाठी दिग्दर्शक म्हणून हा अनुभव खूपच खास होता.
( नक्की वाचा : Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'दादां'च्या आठवणींनी नातवाला अश्रू अनावर; पाहा इमोशनल Video )
'यमला पगला दीवाना' चा किस्सा
धर्मेंद्र यांच्या अत्यंत नम्र आणि मोठेपणाचा एक किस्सा सांगताना सचिन पिळगांवकर यांनी 'यमला पगला दीवाना' या शीर्षकाचा उल्लेख केला.
सचिन म्हणाले, ''90 च्या दशकाच्या उत्तरार्धातील एक किस्सा आहे. मी 'यमला पगला दीवाना' हे चित्रपटाचे शीर्षक 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन' (IMPPA) कडे नोंदवले होते. एके दिवशी एका निर्मात्याने मला फोन करून हे शीर्षक त्यांना देण्याबद्दल विचारले, पण मी त्यांना नकार दिला. काही दिवसांनी, मला स्वतः धर्मेंद्रजींचा फोन आला.''
सचिन यांनी त्यांना 'कसे आहात धरमजी?' असे विचारले, तेव्हा धर्मेंद्र यांनी अत्यंत सौम्यतेने आणि उबदारपणे उत्तर दिले आणि नंतर ते म्हणाले, ''सचिन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे होते... तुमच्याकडे 'यमला पगला दीवाना' हे चित्रपटाचे शीर्षक आहे.''
( नक्की वाचा : Dharmendra Death : धर्मेंद्र यांनी खरंच स्वीकारला होता इस्लाम धर्म? जाणून घ्या 'त्या' वादग्रस्त चर्चेचं सत्य )
यावर सचिन पिळगांवकर यांनी त्वरित आणि आदराने उत्तर दिले, ''नाही, ते आता माझ्याकडे नाही!'' सचिन यांचे हे उत्तर ऐकून धर्मेंद्र स्मितहास्य करत म्हणाले, ''पण, निर्मात्याने मला सांगितले की, तुम्ही त्यांना नकार दिला.'' तेव्हा सचिन म्हणाले, ''ते शीर्षक फक्त तोपर्यंत माझे होते, जोपर्यंत तुम्ही ते मागितले नव्हते. आता ते माझे राहिले नाही, ते तुमचे आहे.''
सचिन यांनी पुढे विचारले की, त्यांना आणखी काही हवे आहे का? कारण, ''ज्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीला इतके काही दिले आहे, त्यांची परतफेड आपण कशी करणार? त्यांचा वारसा नेहमीच सर्वोच्च राहील.'' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन यांनी सांगितलेला हा किस्सा त्यांच्या मोठेपणाची आणि साधेपणाची साक्ष देतो.