Dhurandhar 2 Controversy: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर 2' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळालं आहे. धुरंधर 2 बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड तोडेल असा दावा केला जातोय. सामान्य प्रेक्षक या सिनेमाचं कौतुक करत असतानाच यावर राजकारण सुरु झालंय. शरद पवारांच्या जवळच्या सहकारी आणि राज्यसभा खासदारांनी हा चित्रपट मुस्लीम विरोधी प्रोपगंडा पसरवणारा असल्याचा दावा केला आहे.
चित्रपट की राजकीय विष?
राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, असे चित्रपट जाणीवपूर्वक तयार केले जात असून त्याद्वारे विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे. अशा चित्रपटांचे स्क्रिनिंग चक्क पंतप्रधानांसमोर केले जाते, असे मी ऐकले आहे, असेही त्या म्हणाल्या. चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण देशात मुसलमानांच्या विरोधात एक प्रकारचा प्रोपगंडा चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्याच नागरिकांना शत्रू बनवू नका
देशातील अंतर्गत शांततेचा मुद्दा उपस्थित करताना फौजिया खान म्हणाल्या की, आपल्याच देशातील नागरिकांना एकमेकांचे शत्रू बनवणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आज देशातील मुस्लीम समाज कायद्याचे पालन करून शांततेने राहत आहे. मात्र, कोणतेही ठोस कारण नसताना आपल्याच नागरिकांना शत्रू का मानले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदू आणि मुस्लीम वर्षानुवर्षे प्रेमाने एकत्र राहत असताना, हे विष कालवण्याचे काम सरकारकडून का होत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
( नक्की वाचा : Viral Girl मोनालिसाच्या लग्नामागे मोठं षडयंत्र? '35 तुकडे' आणि 'सीरिया'च्या दाव्याने खळबळ! )
देशाच्या प्रगतीत अडथळा
या प्रकारचा प्रोपगंडा जर त्वरित थांबवला नाही, तर देशात मोठी अस्थिरता निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. देशाच्या प्रगतीसाठी प्रेम आणि आपुलकीची गरज असते, द्वेषाची नाही. सरकार जे विकासाचे मोठे दावे करत आहे, अशा वातावरणामुळे त्यात मोठा अडथळा निर्माण होईल. प्रगतीसाठी सरकारने सौहार्दाला चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2'ची त्सुनामी
एका बाजूला हा राजकीय वाद सुरू असताना, दुसरीकडे रणवीर सिंहच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 कोटी रुपयांहून अधिकचे ॲडव्हान्स ग्रॉस कलेक्शन केले असून, पहिल्या दिवशी एकूण 100 कोटी रुपयांचा आकडा पार होईल अशी शक्यता आहे. बुक माय शो या प्लॅटफॉर्मवर दर तासाला 70 हजार पेक्षा जास्त तिकीट बुक होत असून अनेक चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत.