Gaurav More Home News: अभिनेता गौरव मोरेचे हक्काच्या घराचे स्वप्न 30 वर्षांनंतर पूर्ण झालं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गौरवने व्हिडीओच्या माध्यमातून स्वप्नातले घर घेण्याचा त्याचा प्रवास कसा होता, याची माहिती सांगितली. म्हाडाच्या लॉटरीद्वारे त्याला आलिशान घर मिळालंय. 25 सप्टेंबर रोजी गौरवला त्याच्या घराचा ताबा मिळाला होता. चाळ ते स्वतःचा हक्काचा फ्लॅट, गौरवचा गृह स्वप्नपूर्तीचा प्रवास जाणून घेऊया...
गौरव मोरेने घर घेण्याच्या प्रवासाबाबत काय सांगितले?
अभिनेता गौरव मोरेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी म्हाडाच्या ऑफिसमध्ये आहे आणि माझं स्वतःचं घर झालंय, जे मला म्हाडातर्फे मिळालंय. सर्वात आधी म्हाडाचे आणि संपूर्ण स्टाफचे मनापासून आभार मानतो. माझा हा प्रवास साधा नाही. झोपडपट्टी, ताडपत्रीतलं घर आणि फ्लॅटची चावी असा हा 30 वर्षांचा माझा प्रवास आहे. माझ्या या प्रवासात माझी आई, कुटुंब, मित्रपरिवारही आहेत. घराच्या स्वप्नांना म्हाडाने सत्यात उतरवलंय. मी पवईमध्ये घर शोधत होतो. पवई तलाव मी लहानपणापासून पाहत आलोय. परिसरात गणेश घाटही आहे. त्याच ठिकाणाच्या अगदी समोर आम्हाला घर मिळालं. मी आणि माझं कुटुंब प्रचंड आनंदी आहोत. घर घेण्याचं स्वप्न पाहा आणि ते पूर्णही करा, असे मी प्रत्येकाला सांगेन. घर घेण्याची प्रक्रिया म्हाडाने इतकी सोपी करुन ठेवलीय की मला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही".
एजंट्ससारख्या कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका, असेही आवाहनही गौरवने केलंय.
(नक्की वाचा: Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO)
म्हाडाच्या घराची किल्ली मिळाल्यानंतर गौरव मोरेने शेअर केली होती भावुक पोस्ट
गौरव मोरेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर घराच्या किल्लीचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय की, "(ताडपत्री ते फ्लॅट)... फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो,पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपलं घर असावं हे कायम मनात होतं.लहानपणापासून वाटत होतं जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक २५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं.माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी @mhadaofficial चे मनापासून आभार मानतो."
गौरव मोरेच्या घराची किंमत किती आहे?
- म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या लॉटरीमध्ये गौरव मोरेने अर्ज केला होता.
- कलाकार कोट्यातून त्याने पवई परिसरातील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज दाखल केला होता.
- लॉटरीमध्ये गौरवला हक्काचे घर मिळाले
- गौरव मोरेच्या घराची अंदाजे किंमत 1 कोटी 78 लाख रुपये असल्याचे म्हटलं जातंय.