Gautam Adani In Whistling Woods : मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे सुरू असलेल्या ‘सेलीब्रेट सिनेमा 2025' या प्रतिष्ठित महोत्सवात अदाणी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी यांनी खास मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात, अदाणी यांनी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी महान अभिनेते राज कपूर यांच्या सिनेमा आणि गाण्यांचा आधार घेतला.
'किसी की मुस्कुराहटों' गाणे म्हणजे तत्त्वज्ञान
या महोत्सवात राज कपूर यांच्या चित्रपटांची झलक दाखवण्यात आली, ज्यानंतर गौतम अदाणींनी भारताचा विकास आणि अर्थव्यवस्था यावर आपले मत व्यक्त केले. राज कपूर यांच्या 'अनाडी' चित्रपटातील 'किसी की मुस्कुराहटों' हे गाणे त्यांना खूप महत्त्वाचे वाटते. "हे गाणे केवळ एक गीत नसून, एक जीवन-तत्त्वज्ञान आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. राज कपूर हे भारतीय संस्कृतीचे खरे प्रतिनिधित्व करणारे नायक होते, असं अदाणी यांनी यावेळी सांगितलं.
संघर्षाचे दिवस आणि सिनेमाची शिकवण
यावेळी गौतम अदाणी यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली. एका लहान मुलाने घरातून बाहेर पडून मोठी स्वप्ने कशी पूर्ण केली, हा अनुभव त्यांनी सांगितला. ते म्हणाले, "मी स्वतःची कहाणी लिहितो, मी चित्रपटांमधील नायकांना पाहून मोठा झालो. 'पळू नका, घाबरू नका, गंतव्यस्थान दूर असले तरी मार्ग बदलू नका' ही शिकवण मला सिनेमांनीच दिली."
हजारो सिनेमा विद्यार्थ्यांसमोर बोलताना अदाणींनी सांगितले की, सिनेमा हे एक शक्तिशाली माध्यम आहे आणि ते जागतिक स्तरावर भारताची रचनात्मक उपस्थिती स्थापित करण्यात मोठी भूमिका बजावू शकते.
या महत्त्वाच्या सत्रात गौतम अदाणी यांच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन, ब्लॉकबस्टर फिल्ममेकर राजकुमार हिरानी, निर्माता महावीर जैन आणि व्हिसलिंग वुड्सचे संस्थापक सुभाष घई यांसारखे दिग्गज उपस्थित होते. या सर्वांमुळे या सत्राला एक खास आणि वेगळे परिमाण लाभले.