Geetanjali Kulkarni Interview : चित्रपट आणि मनोरंजन विश्वातील प्रगल्भ जोडपं म्हणून अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांच्याकडे पाहिलं जातं. अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे, तर गीतांजली कुलकर्णी यांनी देखील कोर्ट, अग बाई अरेच्चा आणि गुल्लक सारख्या कलाकृतींमधून स्वतःचा मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.
मात्र, या लोकप्रिय जोडीने लग्नानंतर मुल जन्माला न घालण्याचा जो निर्णय घेतला, त्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगत असते. अनेक चाहत्यांना हा प्रश्न पडतो की, इतक्या यशस्वी करिअरनंतरही त्यांनी हा विचार का केला असेल? अखेर यावर गीतांजलीने पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
आरपार या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका खास मुलाखतीत गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेत्री पर्ण पेठे सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुग्धा गोडबोले यांनी त्यांना या खासगी आयुष्यातील निर्णयाबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार केला नाही किंवा कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला नाही, मग भविष्यात कधी तरी हा निर्णय चुकला असं वाटेल का, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर गीतांजलीने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar: रहमत डकैतचा अंत सिनेमात दाखवला तसाच झाला होता का? वाचा 'Reel vs Real' स्टोरी )
मुलाच्या जबाबदारीपेक्षा कामावर फोकस
गीतांजलीने या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, जेव्हा ती 31 वर्षांची होती, तेव्हा तिला या निर्णयाबद्दल थोडी भीती वाटत होती. मात्र, आताच्या वयात तिला या गोष्टीची अजिबात भीती वाटत नाही. तिने स्पष्ट केलं की, मुल असल्यावर निसर्गतःच पालकांचा पूर्ण फोकस तिथेच असतो. पण मुल नसल्यामुळे तिला आजवर अनेक नवनवीन गोष्टी करता आल्या आणि स्वतःच्या आवडीनिवडी जोपासता आल्या.
समाजासाठी वेळ देणं शक्य झालं
आपल्या वेळेचा आणि माईंडस्पेसचा उपयोग इतरांसाठी करता येतो, असं गीतांजलीला वाटतं. तिने सांगितलं की, मुल नसल्यामुळे मिळालेल्या वेळेत ती तिच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांसाठी आणि ज्या गावात ती राहते, तिथल्या मुलांसाठी वेळ देऊ शकते. या मुलांना मदत करताना तिला जो आनंद मिळतो, तो तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपला उपयोग समाजासाठी होत आहे, या भावनेमुळे तिला आपल्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप झाला नाही.
( नक्की वाचा : सासू अशी असेल तर मुलगी कशी...सासूबाईंनी नवरदेवाचं असं केलं स्वागत की.. वऱ्हाडात संचारला जबरदस्त उत्साह, VIDEO )
पर्ण पेठेचं मुलांबद्दलचं मत
याच मुलाखतीत पर्ण पेठेने देखील तिची बाजू मांडली. पर्ण म्हणाली की, तिचं या विषयावर अजून पूर्णपणे ठाम मत झालेलं नाही. तिला मुलं प्रचंड आवडतात आणि ती मुलांसोबत कामही करते. सध्या ती अशा वयात आहे जिथे ती या विषयावर विचार करत आहे. जर भविष्यात तिने मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला, तर ती जबाबदारी ती खूप प्रेमाने पार पाडेल, असंही तिने नमूद केलं. स्वतःचं मुल असावं की नाही, यावर तिचे विचार अजून प्रोसेसमध्ये असल्याचं तिने सांगितलं.
केवळ काळजी घेण्यासाठी मुलं नकोत
या चर्चेदरम्यान कम्युनिटी म्हणजे समाजाचं महत्त्व गीतांजलीने अधोरेखित केलं. तिला कधीच एकटं वाटत नाही किंवा फॅमिली नसल्याची कमतरता भासत नाही. पर्ण पेठेने यावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, केवळ म्हातारपणी आपली काळजी घेण्यासाठी मुलांना जन्माला घालावं, असं तिला वाटत नाही. मुलं उद्या आपल्या जवळ असतीलच असं नाही, ती स्वतःची वेगळी वाट निवडू शकतात. त्यामुळे या कारणासाठी मुलं असणं तिला पटत नाही.