Dhurandhar Movie vs Real Life: कराचीच्या ल्यारी भागातील गँगस्टर रहमत डकैत याचे आयुष्य धुरंधर या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या सिनेमात अक्षय खन्नाने रहमत डकैतची भूमिका साकारली असून त्याचे पात्र एका हॉस्पिटलमधून सुरू होऊन हॉस्पिटलमध्येच संपते.
पडद्यावर तो थरथरत्या ओठांनी आणि रडक्या डोळ्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह ओळखण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येताना दिसतो. एका लग्न समारंभात त्याच्या मुलाची हत्या झालेली असते, ज्याचे चित्रण 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'रेड वेडींग'सारखे वाटते. सिनेमाच्या शेवटी रहमतचा स्वतःचा अंतही रक्ताळलेल्या अवस्थेत स्ट्रेचरवरच होतो. खऱ्या आयुष्यातही सरदार अब्दुल रहमान बलोच उर्फ रहमत डकैतचा अंत असाच भीषण झाला होता.
रहमत डकैतची खरी कहाणी
रिअल लाईफमध्ये 2009 मध्ये रहमत डकैत आणि त्याचे तीन साथीदार अकील बलोच, औरंगजेब बाबा आणि नजीर बाला दोन वाहनांमधून कराचीच्या कथोर परिसरातून जात होते. त्यावेळी तपास विभागाचे एसएसपी चौधरी अस्लम खान यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, नॅशनल हायवेजवळ दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत रहमत आणि त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चौधरी अस्लम यांनी अधिकृतपणे जाहीर केले होते की, मारला गेलेला व्यक्ती दुसरा कोणी नसून कुख्यात रहमत डकैतच आहे.
( नक्की वाचा : Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...' )
सिनेमातील चित्रण आणि वास्तवातील फरक
धुरंधर सिनेमात संजय दत्तने चौधरी अस्लमची भूमिका साकारली आहे. सिनेमात दाखवले आहे की, रहमत आपल्या आजारी मुलाला घेऊन हॉस्पिटलला जात असताना चौधरी अस्लम त्याला ताब्यात घेतात. मात्र, रणवीर सिंगने साकारलेले हमजा अली मझारी हे पात्र मध्यस्थी करते आणि रहमतची सुटका होते.
कथानकाच्या शेवटी हमजा आपली बाजू बदलतो आणि राजकीय नेते जमील जमाली (राकेश बेदी) आणि चौधरी अस्लम यांच्याशी हातमिळवणी करून रहमतचा काटा काढण्याचे ठरवतो. मोठ्या थरारानंतर रहमत पकडला जातो आणि चौधरी अस्लम त्याच्या गळ्यात गोळी झाडतात. हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्याचे रक्त थांबावे म्हणून हमजाला जखमेवर बोट ठेवायला सांगितले जाते. मात्र, वास्तवात हे इतके सोपे नव्हते.
( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )
बनावट एन्काउंटरचा आरोप आणि वाद
रहमत डकैतच्या पत्नीने या एन्काउंटरला न्यायालयात आव्हान दिले होते. तिने असा दावा केला होता की, तिच्या पतीला आणि त्याच्या मित्रांना 9 ऑगस्ट 2009 रोजी कोस्टल हायवेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले होते.
तिच्या दाव्यानुसार, 10 ऑगस्ट 2009 च्या रात्री एका बनावट एन्काउंटरमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. रहमत हा एक समाजसेवक म्हणून पुढे येत होता आणि राजकारणात त्याचे वाढते वजन पाहून काही राजकीय नेत्यांनी आणि नोकरशहांनी त्याचा गेम केल्याचा आरोप तिने केला होता. पोस्ट मॉर्टेम अहवालातही त्याला अगदी जवळून (3 फूट अंतरावरून) गोळी मारल्याचे समोर आले होते, ज्यामुळे या चकमकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
( नक्की वाचा : Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ? )
रहमतचा शेवट आणि चौधरी अस्लमचा अंत
काही लोकांच्या दाव्यानुसार रहमत डकैतच्या हत्येमागे बलुच लिबरेशन आर्मीचा (BLA) हात असू शकतो, कारण त्याचे त्यांच्याशी शस्त्रास्त्रांच्या व्यवहारावरून संबंध होते. रहमतच्या मृत्यूनंतर चौधरी अस्लम यांनी अभिमानानं सांगितले होते की, डकैत मेला असून त्याची गँग आता संपली आहे.
या प्रकरणात सुरुवातीला चौधरी अस्लम यांची निर्दोष मुक्तता झाली होती, पण नंतर त्यांच्याविरुद्ध पुन्हा चौकशी सुरू झाली. मात्र, न्यायालयाचा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच 2014 मध्ये एका आत्मघाती बॉम्बस्फोटात चौधरी अस्लम मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने स्वीकारली होती. रहमत डकैतचे राजकारण आणि गुन्हेगारीतील स्थान आजही अनेक रहस्यांनी वेढलेले आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar Movie : धुरंधरमध्ये झाली एक मोठी चूक ! तुम्हाला पाहताना लक्षात आली का? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world