Dharmendra's Prayer Meet: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर गुरुवारी दिल्लीतील जनपथ येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या श्रद्धांजली सभेत त्यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी स्टेजवर येऊन एक अत्यंत भावनिक भाषण केले. ज्यामुळे त्यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले.
हेमा मालिनी झाल्या भावूक
हेमा मालिनी बोलत असताना, त्यांच्या कन्या ईशा देओल आणि आहाना देओल त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. हेमा मालिनी यांनी यावेळी म्हटलं की, "संपूर्ण जग त्यांच्या निधनाचे दुःख करत आहे, पण माझ्यासाठी हा एक 'असह्य धक्का' आहे. आमची साथ तुटली आहे." या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
(नक्की वाचा- Dharmendra : धर्मेंद्र यांचे ते 'सीक्रेट लेटर' आणि फोन कॉल; अमित शाह यांनी प्रेयर मीटमध्ये उघड केला खास किस्सा)
अपूर्ण राहिलेले स्वप्न
यावेळी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अज्ञात पैलू आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सर्वांना सांगितले. धर्मेंद्र यांना उर्दू शायरीची आवड होती आणि त्यांना त्यांच्या या रचना पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करण्याची तीव्र इच्छा होती.
हेमा मालिनी यांनी सांगितले, "वेळेनुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छुपा पैलू समोर आला, जेव्हा ते उर्दूची शायरी करू लागले. त्यांची खास गोष्ट ही होती की, कोणतीही परिस्थिती असो, ते त्या परिस्थितीनुसार त्वरित एक शेर ऐकवत असत."
(नक्की वाचा- Pranit More Show: कॉमेडियन प्रणित मोरेचा शो कसा पाहायचा? तिकीट बुकिंगपासून किमतीपर्यंतची संपूर्ण माहिती)
"मी त्यांना अनेकदा सांगितले होते की त्यांनी एक पुस्तक लिहावे. त्यांच्या चाहत्यांना ते नक्कीच आवडले असते. त्यामुळे, ते याबाबत खूप गंभीर होते आणि सर्व योजना आखत होते, पण... ते काम अपूर्ण राहिले," अशा शब्दात हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे साहित्य प्रकाशित करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, याचे दुःख व्यक्त केले.
धर्मेंद्र यांच्या या अपूर्ण स्वप्नाची माहिती मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही त्यांच्या शायरीत आवड निर्माण झाली आहे.