तरुणाईमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमाची प्रचंड क्रेझ आहे. या प्रसिद्ध कार्यक्रमातील व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मात्र समय रैना होस्ट करत असलेला हा कार्यक्रम सध्या हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि स्टँड-अप कॉमेडियन रणवीर अल्लाहबादिया केलेल्या एका अश्लील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमातील एका वक्तव्यावरुन सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अलिकडेच या कार्यक्रमातलोकप्रिय युट्यूबर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादिया याला बोलावण्यात आले होते. त्यावेळी रणवीरने केलेल्या एका वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहिला आहे. रणवीर अलाहबादियाने या कार्यक्रमात बोलताना एका स्पर्धकाच्या आई- वडिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले.
तुला पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल की, त्यांना साथ द्यायला आवडेल? असा संतापजनक सवाल त्याने त्या स्पर्धकाला विचारला. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणात आता रणवीर इलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संताप व्यक्त केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो, तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपतं. हे बरोबर नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात, आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत. जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनीही या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे. आई - वडील आणि मुलं ह्यांच्या निरागस नात्याबद्दल स्वतःला इन्फ्ल्यून्सर म्हणवणारे रणदीप अलाहाबादीया सारखे बिनडोक वाट्टेल ते बोलतात, त्यांना बोलवणारे निलाजरे युट्यूबर विनोदाच्या नावाखाली अश्लील बोलतात. इतर वेळेला संस्कृती रक्षणाचा ठेका घेणारे भाजपा सरकार अशा विकृतांना आता काय अद्दल घडवणार हेच आम्हाला पहायचं आहे, असे अखिल चित्रे म्हणालेत.