Kabir Bedi Celebrates 80th Birthday and 10th Wedding Anniversary : ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदी सध्या त्यांच्या खास फोटोंमुळे चर्चेत आला आहे. कबीरने त्याची पत्नी परवीन दुसांजसोबत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुंदर क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही ट्रिप त्याच्यासाठी अनेक अर्थांनी खास होती. कबीरने नुकताच 16 जानेवारी रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा केला. याच काळात त्यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या एकत्र असण्याला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या तिहेरी आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी या जोडीने गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणाची निवड केली होती.
निसर्गाच्या सानिध्यात खास सेलिब्रेशन
कबीर आणि परवीनने सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी हिरवेगार माड, समुद्राच्या लाटा आणि उबदार उन्हात घालवलेल्या वेळेचे वर्णन केले आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, लग्नाचा 10 वा वाढदिवस, एकत्र राहण्याची 20 वर्षे आणि माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. हा काळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि स्वतःचा विचार करण्यासाठी अत्यंत शांत असा होता.
या फोटोंमध्ये हे जोडपे समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री लिलेट दुबेने देखील या पोस्टवर कमेंट करत त्यांना वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वयाच्या अंतरामुळे झाली होती मोठी चर्चा
कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हापासूनच ते चर्चेत राहिले आहेत. कबीरने 2016 मध्ये परवीनशी लग्न केले, जी त्याच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे. या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.
विशेष म्हणजे, कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी ही तिची सावत्र आई परवीनपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. लग्नाच्या वेळी पूजाने सोशल मीडियावर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती आणि परवीनबद्दल वादग्रस्त विधानही केले होते. मात्र, काळाच्या ओघात आता बेदी कुटुंबातील हे वाद मिटल्याचे दिसते आणि त्यांच्यातील संबंध आता सुधारले आहेत.
( नक्की वाचा : Govinda Affair: 'गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर...', पत्नी सुनीता आहुजाचा धक्कादायक गौप्यस्फोट )
कबीर बेदी यांची चार लग्नं
कबीर बेदीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहे. त्याने आतापर्यंत चार वेळा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्याशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना पूजा आणि सिद्धार्थ ही दोन मुले झाली. त्यानंतर कबीरने ब्रिटीश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेस आणि नंतर टेलिव्हिजन प्रेझेंटर निक्की बेदी यांच्याशी लग्न केले होते. अनेक चढ-उतारानंतर आता तो परवीनसोबत त्यांचे आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहे.
जागतिक स्तरावर गाजलेली कारकीर्द
केवळ बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कबीर बेदीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने 'खून भरी मांग' आणि 'ताजमहल: एन इटरनल लव्ह स्टोरी' सारख्या सुपरहिट भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.
युरोपियन टेलिव्हिजन मालिका 'संदोकन' मधील त्याच्या भूमिकेला जगभरातून मोठी प्रसिद्धी मिळाली. इतकेच नाही तर हॉलीवूडमधील प्रसिद्ध जेम्स बाँड सिरीजमधील 'ऑक्टोपसी' या चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या दमदार आवाजाने आणि अभिनयाने त्याने आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.