Actor Raju Talikote Passes Away : साऊथ सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेते आणि धारवाड रंगायनचे संचालक राजू तालिकोटे यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एका ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
राजू तालिकोटे यांनी रंगमंच आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आणि विशेषतः हास्य अभिनेता म्हणून खूप ख्याती मिळवली होती. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन पत्नी, दोन मुले आणि तीन मुली आहेत. त्यांचे पुत्र भरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तालिकोटे यांना यापूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या वेळी पुन्हा झटका आल्याने त्यांना वाचवता आले नाही. भरत यांनी नम्रपणे सांगितले की, 'आमच्या वडिलांना दोन पत्नी होत्या, पण आम्ही सर्वजण एकत्र वाढलो आहोत'.
(नक्की वाचा- KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट वर्तन, मुलाला मानसिक विकार? कौशल इनामदारांची पोस्ट चर्चेत)
राजू तालिकोटे यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "प्रसिद्ध रंगमंच अभिनेता, हास्य अभिनेता आणि धारवाड रंगायनचे संचालक राजू तालिकोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, हे अत्यंत दुःखद आहे. अनेक कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करून अपार लोकप्रियता मिळवलेल्या राजू तालिकोटे यांचे निधन कन्नड फिल्म उद्योगासाठी मोठी हानी आहे."