Actor Brahmanandam News: जॉनी लिव्हर, राजपाल यादव, परेश रावल यासारखे दिग्गज कलाकार त्यांच्या विनोदी सिनेमांसाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. कपिल शर्मा देखील टीव्ही आणि ओटीटी कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करताना दिसतोय. पण साऊथ इंडस्ट्रीमधील एक असे सुपरस्टार आहेत, ज्यांनी विनोदी अभिनेता म्हणून ठसा उमटवला आहेच शिवाय 1000 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केल्याने त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद केली गेलीय. तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय, आपण 'कन्नेगंती ब्रह्मानंदम' (Actor Brahmanandam) यांच्याबाबत चर्चा करतोय. ब्रह्मानंदम म्हणून ते लोकप्रिय आहेत. भारतीय सिनेमा विशेषतः तेलुगू सिनेमांमध्ये प्रसिद्ध आहेत. अनोखे हास्य, शानदार अभिनय आणि परफेक्ट टायमिंगच्या कौशल्यावर त्यांनी सिनेरसिकांच्या मनामध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केलंय. परिश्रमाच्या जोरावर ते सर्वाधिक कॉमेडिअन अभिनेतेही बनले आहेत.
ब्रह्मानंदम यांच्या नावे अनोखा रेकॉर्ड
ब्रह्मानंदम यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेलंय. कारण त्यांनी आजवर सर्वाधिक म्हणजे 1000 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. केवळ 38 वर्षांमध्ये त्यांनी ही अभूतपूर्व कामगिरी केलीय.
(नक्की वाचा: स्मृती इराणींच्या पतीचे 10 फोटो, पाचवा पाहून म्हणाल: तुलसीच्या Reel Life मिहिरलाही टाकलं मागे)
ब्रह्मानंदम या सिनेमामुळे रातोरात झाले सुपरस्टार
1987 मध्ये रिलीज झालेल्या "आहा ना पेल्लांटा!" या सिनेमाद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. दिग्दर्शक जंध्याला यांनी त्यांना संधी दिली आणि या सिनेमामुळे ते रातोरात स्टार झाले. यानंतर 90च्या दशकात आणि वर्ष 2000च्या सुरुवातीस त्यांनी तेलुगू सिनेमांमध्ये प्रचंड नाव कमावले. विवाह भोजानमबु (1988), जगदेका वीरुडु अतिलोका सुंदरी (1990), हॅलो ब्रदर (1994), मनमधुडु (2002), धी (2007), रेडी (2008), दूकुडु (2011), रेस गुर्रम (2014) हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
सोशल मीडियावर ब्रह्मानंदम यांच्या मीम्सचा पाऊस
ब्रह्मानंदम यांनी तमिळ, हिंदी आणि कन्नड भाषिक सिनेमांमध्येही काम केलंय, पण त्यांना तेलुगू भाषिक सिनेमांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. कॉमेडी आणि जबरदस्त अभिनयामुळे त्यांनी "हास्य ब्रह्मा" आणि "मीम्सचे देवता" म्हणूनही संबोधले जाते. वर्ष 2009 मध्ये ब्रह्मानंदम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(नक्की वाचा: Vijay Deverakonda: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण?)
ब्रह्मानंदम सर्वात महागडे कॉमेडिअन अभिनेते
ब्रह्मानंदम देशाचे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आहेतच पण ते एक सर्वात महागडे विनोदी अभिनेते देखील आहेत. विविध स्त्रोताच्या माध्यमामुळे त्यांची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे म्हटले जाते. ब्रह्मानंदम प्रत्येक सिनेमासाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतात. याव्यतिरिक्त जाहिरातींसाठी ते मोठे मानधन घेत असल्याची माहिती आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी रणबीर कपूर, प्रभास आणि कपिल शर्मा या सारख्या कलाकारांनाही मागे सोडलंय.