भारतीय सिनेमाचा प्रभाव आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्मिती संस्था होम्बले फिल्म्सच्या दोन सुपरहिट चित्रपटांनी ऑस्कर 2026 च्या (Oscars 2026) 'जनरल एन्ट्री' लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' आणि 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. ही केवळ एका निर्मिती संस्थेची नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठी झेप मानली जात आहे.
कोणत्या कॅटेगरीमध्ये होणार विचार?
जनरल एन्ट्री लिस्टमध्ये स्थान मिळाल्यानंतर आता हे चित्रपट विविध महत्त्वाच्या पुरस्कार श्रेणींसाठी विचारात घेतले जातील. यामध्ये प्रामुख्याने: सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (ऋषभ शेट्टी आणि अश्विन कुमार), सर्वोत्कृष्ट पटकथा/लेखन, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सिनेमॅटोग्राफी या श्रेणींमध्ये हे चित्रपट शॉर्टलिस्ट होणार का, याचा अंतिम निर्णय आता अकॅडमीतर्फे घेतला जाईल.
होम्बले फिल्म्सचे मोठे वर्चस्व
विशेष म्हणजे, यावर्षी ऑस्करच्या जनरल एन्ट्री लिस्टमध्ये भारताकडून एकूण 5 चित्रपटांचा समावेश आहे. त्यातील 2 चित्रपट एकट्या होम्बले फिल्म्सचे आहेत. यावरून या निर्मिती संस्थेचा जागतिक स्तरावर वाढता प्रभाव स्पष्ट होतो.
भारतीय संस्कृतीला जागतिक ओळख
होम्बले फिल्म्सने नेहमीच आपल्या मातीतील कथा, संस्कृती आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा संगम साधत जागतिक दर्जाचे चित्रपट दिले आहेत. 'कांतारा'ने यापूर्वीच भारतीय लोकसंस्कृतीला जगभरात ओळख मिळवून दिली आहे, तर 'महावतार नरसिम्हा'ने आपल्या पौराणिक कथांना भव्य रूपात मांडले आहे. या यशामुळे भारतीय सिनेमाची क्रिएटिव्ह ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.