कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा यांने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनमधून दमदार पुनरागमन केले आहे. यासोबतच त्यांनी 'किस किसको प्यार करूं 2' या त्यांच्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. दरम्यान, कॉमेडियन ते अभिनेते बनलेल्या कपिल शर्मा यांने आता पत्नी गिन्नी चतरथसोबत कॅनडामध्ये एक रेस्टॉरंट उघडले आहे. ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कपिल-गिन्नी यांच्या 'कॅप्स कॅफे'चे (Caps Cafe) आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय पहिल्या दिवशी या रेस्टॉरंटमध्ये काय घडले याचाही व्हिडीओ समोर आला आहे.
कपिल शर्मांच्या चाहत्यांनी त्याच्या या नव्या रेस्टॉरंटसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. गिन्नी चतरथ यांनी सोशल मीडियावर रेस्टॉरंटचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यानंतर एका कंटेंट क्रिएटरने कपिलच्या कॅफेच्या आतील व्हिडिओ शेअर केला आहे. या कंटेंट क्रिएटरने कॅनडातील व्हँकुव्हर येथील कपिलच्या कॅफेला भेट दिली. कॅफेची सजावट गुलाबी, सोनेरी आणि पांढऱ्या रंगात केली आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटला खूप शानदार लुक मिळाला आहे. मात्र, व्हिडिओमध्ये असेही दिसून आले की कॅफेमध्ये कोणतीही डिश 500 रुपयांपेक्षा कमी नाही. त्यामुळे इतर रेस्टॉरंटच्या तुलनेत ते महाग असल्याचे ही समोर आले आहे. असं असलं तरी पहिल्याच दिवशी या रेस्टॉरंटमध्ये रांगा दिसून आल्या. मोठ्या प्रमाणात जेवणासाठी इथं गर्दी दिसली.
याआधी कपिलची पत्नी गिन्नी चतरथने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅफेचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. कपिलचे मित्र किकू शारदा, बलराज स्याल आणि इतरांनीही त्यांना या नवीन सुरुवातीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. या सीझनच्या एका एपिसोडमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि खेळाडू ऋषभ पंत, अभिषेक शर्मा आणि युजवेंद्र चहल दिसले. या एपिसोडचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या एपिसोडची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात गौतम गंभीर हसताना दिसला आहे.