दिवंगत बिझनेसमन संजय कपूर यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान यांनी संजय यांची दुसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचेवरील सुनावणी शुक्रवारी झाली. या सुनावणीदरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. करिश्माच्या मुलांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दावा केला की, संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर, घटस्फोटाच्या आदेशानुसार मुलांचा खर्च भागवण्यासाठी असलेली मालमत्ता आता प्रिया कपूर यांच्या नियंत्रणाखाली आहे. यामुळे, करिश्मा कपूरची मोठी मुलगी समायरा हीची दोन महिन्याची फी भरता आलेली नाही. समायरा ही अमेरिकेतील शाळेत शिकत आहे.
वकिलांचा हा दावा ऐकून न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी करिश्मा कपूरच्या वकीलांची चांगलीच कान उघाडणी केली. “मला या सुनावणीत 'मेलोड्रामा' नको आहे.” असं सांगत करिश्मा कपूरच्या वकीलांना झापलं. तर समायराची फी भरली नसल्याचा दावा प्रिया कपूर यांचे वकील राजीव नायर यांनी तातडीने खोडून काढला. मुलांचा सर्व खर्च पूर्ण केला गेला आहे. हा केवळ बातमी करण्यासाठी केलेला दावा असल्याचं त्यांनी म्हटलं.
यावर, न्यायमूर्ती सिंह यांनी प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना असे किरकोळ आणि भावनिक मुद्दे पुन्हा कोर्टात न येण्याची खात्री करण्यास सांगितले. “हा प्रश्न माझ्या कोर्टात पुन्हा येऊ नये. मला यावर 30 सेकंदांपेक्षा अधिक वेळ घालवायचा नाही,” असा सज्जड इशाराच न्यायमूर्तींनी दिला. जून महिन्यात लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले होते.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
त्यांच्या निधनानंतर त्यांची 30,000 कोटी रुपयांची संपत्ती वादात अडकली आहे. करिश्माच्या मुलांचा आरोप आहे की, प्रिया कपूर यांनी संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राची बनावट प्रत तयार करून संपूर्ण मालमत्तेवर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी खोटे मृत्यूपत्र बनवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. करिश्मा आणि संजय यांनी 2003 मध्ये लग्न केले होते. त्यांना 2 मुले झाल्यानंतर 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता याच मालमत्तेच्या वाटणीवरून कोर्टात कायदेशीर लढाई सुरू आहे.