Katrina Kaif Pregnant : बॉलिवूड फॅन्स ज्याचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करत होते तो खरा ठरलाय. कतरिना कैफ लवकरच आई होणार आहे. कतरिना कैफ आणि तिचा अभिनेता पती विकी कौशल यांनी याबाबतची अधिकृत घोषणा (Katrina Kaif And Vicky Kaushal Announce Pregnancy) केली आहे.
कतरिना आणि विकी यांचं 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न झालं होतं. कतरिना विकी कौशल पेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर चार वर्षानंतर त्यांनी मुलाचा निर्णय घेतला. कतरिना कैफ सध्या 42 वर्षांची आहे. तिच्या घोषणेमुळे देशातील शहरी भागात महिलांमध्ये वाढत असलेल्या नव्या ट्रेंडची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या ट्रेंडनुसार महिला उशीरा आई होण्याचा पर्याय निवडत आहेत.
उशिरा गर्भधारणेची कारणे (Late Pregnancy Trends)
आजकाल, उशिरा गर्भधारणा (late pregnancies) होणे सामान्य झाले आहे. अनेक स्त्रिया आई बनण्याआधी शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्याला जास्त महत्त्व देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या ट्रेंडचं प्रसिद्ध उदाहरण आहे. दीपिकानं 8 सप्टेंबर 2024 रोजी 38 व्या वर्षी मुलीला जन्म दिला. दीपिकासह वेगवेगळ्या क्षेत्रातील आघाडीच्या महिला उशीरा आई झाल्या आहेत.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
समाजात उशिरा गर्भधारणेला आता स्वीकारले जात असले आणि वैद्यकीय सोयी वाढल्या असल्या तरी, वाढत्या वयामुळे काही आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. वय वाढल्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते आणि गुंतागुंत होण्याचा धोकाही वाढतो.
( नक्की वाचा : कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीवर विकी कौशलनं सोडलं मौन, गुड न्यूजवर म्हणाला... )
एशियन हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ञ डॉ. उषा प्रियंबदा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, "आजच्या महिला कुटुंब नियोजनाबद्दल खूप माहिती घेऊन आणि स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत. वयाच्या 30 व्या किंवा 40 व्या वर्षी बाळंत होणे आता काही असामान्य गोष्ट राहिली नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "पण, आपल्याला वैद्यकीय परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि महिलांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळेल याची काळजी घेतली पाहिजे."
योग्य आरोग्य नियोजनउशिरा गर्भधारणेचे नियोजन करताना आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर सांगतात. आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमित तपासण्या करणे, गर्भधारणेपूर्वी योग्य सल्ला घेणे आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.
कोणती काळजी आवश्यक?
'नर्चर' येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयव्हीएफ (IVF) एक्सपर्ट डॉ. अर्चना धवन बजाज यांनी NDTV शी या विषयावर बोलताना सांगितले की, "योग्य वैद्यकीय मदतीने, 30 आणि 40 च्या दशकातील अनेक महिलांना निरोगी गर्भधारणा आणि बाळं होतात."
त्या पुढे म्हणाल्या, "चांगले नियोजन करणे, संभाव्य अडचणींबद्दल माहिती ठेवणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. आयव्हीएफ (IVF) आणि 'एग फ्रीझिंग' (egg freezing) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे महिलांना कुटुंब नियोजनात अधिक वाव मिळाला आहे."
( नक्की वाचा : Priya Sachdev : 'मी गर्भवती असतानाच समजले की लग्न टिकणार नाही', संजय कपूरच्या पत्नीचा पहिल्या लग्नाबाबत खुलासा )
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, उशिरा आई होण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या महिला उशिरा मातृत्व स्वीकारतात, त्या सहसा आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात, मानसिकदृष्ट्या तयार असतात आणि मुलाचे संगोपन करण्यासाठी त्या पूर्ण वेळ देऊ शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, हा निर्णय नेहमीच वैयक्तिक तयारी आणि वैद्यकीय सल्ल्याचा समतोल साधून घ्यायला हवा.
आता उशिरा आई होणे हे सामान्य झाले आहे, हेच कतरिना कैफच्या उदाहरणाने दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर हे उदाहरण एका मोठ्या सांस्कृतिक बदलाचे प्रतीक आहे. योग्य वैद्यकीय मदत आणि चांगली जीवनशैली यामुळे 30 आणि 40 च्या दशकातही आई होणे आनंददायक आणि सुरक्षित असू शकते, हे आजच्या महिला सिद्ध करत आहेत.