'लागीर झालं जी' फेम अभिनेत्याची नवी इनिंग, फलटणमध्ये सुरु केला हा उद्योग

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयाची आवड जपत उद्योग क्षेत्रातही आघाडीवर आहेत. 'झी मराठी' वरील 'लागीर झालं जी' या मालिकेनं चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका बंद होऊन चारपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. त्यानंतरही यामधील कलाकारांची चर्चा होत असते. या मालिकेतील अभिनेता महेश जाधवनं आता नवा व्यवसाय सुरु केलाय. 

महेशनं सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला आहे. ‘हॅलो शॉरमा', असं फूड ट्रकचं नाव आहे. हा फूड ट्रक महेशने मित्राच्या मदतीनं सुरू केलाय. यासंदर्भात महेशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये इतर कलाकार मंडळींनी महेशला नवीन व्यवसायासाठी दिल्या आहेत.

महेश जाधव याने 'लागीरं झालं जी' या मालिकेत टॅलेंटची भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या मालिकेनंतर त्यानं 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात देखील काम केलं. याशिवाय तो ‘फकाट' या चित्रपटातही झळकला .

Advertisement

उद्योगविश्वातील मराठी कलाकार

महेश जाधवप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनी यापूर्वीच स्वतंत्र व्यवसाय सुरु करुन उद्योगविश्वात बस्तान बसवलंय. अभिनेत्री आरती वडगबाळकर ही निर्माती आणि यशस्वी डिझाइनरसुद्धा आहे. 'कलरछाप' हा तिच्या कपड्याचा ब्रँड आहे. तुला पाहते रे' फेम अभिनेत्री अभिज्ञा भावेनं एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेतलं. अभिनयातही करिअर करणाऱ्या अभिज्ञाने तिची खास मैत्रीण तेजस्विनी पंडित हिच्यासोबत मिळून कपड्यांचा एक ब्रँड लाँच केला. अभिज्ञाला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे. 'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनीने मिळून लाँच केला. तरुणांमध्ये हा ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी 2' चा विजेता शिव ठाकूरही मागं नाही.  शिवने नुकताच स्वत:चा डिओडरंट ब्रँड लाँच केला आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ज्वेलरी डिझाइनरसुद्धा आहे. अपूर्वा तिचे अनेक डिझाइन्स सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा 'अपूर्वा कलेक्शन' हा ज्वेलरी ब्रँड आहे.

Advertisement

ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा साड्यांचा व्यवसाय आहे. 'द सारी स्टोरी' हा तिचा ब्रँड महिलांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.  'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. 'हंसगामिनी' असं त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे. मेघा धाडे, श्रेया बुगडे, अनघा अतुल, अरबाज शेख, तेजस्विनी पंडित अशा अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता या यादीत महेश जाधवची भर पडलीय.