Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. शनिवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या सुरांनी संगीत क्षेत्राला सजवलं. त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला.
आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातून जितकं प्रेम मिळालं, तितकच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दु:खात गेलं. वैविध्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा ताईंना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले यांनी आपली बायोग्राफी '‘Asha Bhosle: A Life In Music' मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. राम्या शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
घरातून काढला होता पळ...
आशा ताईंचा संघर्ष त्यांच्या बालपणापासून सुरू झाला होता. मोठेपणी त्यांची लता दीदींशी तुलना केली जात असतानाही आशा भोसले यांनी हार मानली नाही. लता मंगेशकर आपल्या काळातील सर्वात मोठ्या पार्श्वगायिका होत्या. आशा भोसले यांच्या नावावर सर्वाधिक गाणं गाणाऱ्या कलाकाराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
१९४९ मध्ये आशा ताई १६ वर्षांच्या होत्या, त्यावेळी आशा भोसले या गणपतराव भोसले यांच्यासोबत घरातून पळून गेल्या होत्या. पुस्तकात दिल्यानुसार, आशा यांच्या लग्नावर त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर या फार खूश नव्हत्या. त्यानंतर बराच काळ त्या आशा भोसलेंशी बोलल्या नाहीत.
२० वर्षांनी मोठे होते गणपतराव...
बायोग्राफीत दिल्यानुसार, आशा भोसले यांचे पती गणपतराव भोसले २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर काही काळ सर्व ठीक सुरू होतं. मात्र नंतर आशा आणि गणपतराव यांच्यात वाद होऊ लागला. आशा आणि गणपतराव यांना तीन मुलं होती. हेमंत, आनंद आणि मुलगी वर्षा.
पुस्तकात दिल्यानुसार, अशी अफवा आहे की, गणपतरावांना दारुचं व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनात त्यांचं स्वत:वरील संतुलन राहत नव्हतं. नशेत ते पत्नीला मारहाण करीत होते. बायोग्राफीनुसार, आशा ताई गर्भवती असताना त्यांना पतीकडून मारहाण करण्यात आली होती. आशा भोसले यांच्या सासरची मंडळी संकुचित विचारांच्या होत्या. बायोग्राफीत आशा भोसले यांनी म्हटलंय, माझे पती चिडचिडे होते. कदाचित त्यांना मला त्रास देण्यात मजा येत असावी. ते सर्वात दुःखी व्यक्ती होते, असं वाटतं. मात्र बाहेर कुणाला याबाबत माहीत नव्हतं.
स्वत:ला संपवण्याचा केला प्रयत्न...
बायोग्राफीत राम्या यांनी लिहिलं, जेव्हा आशा भोसले तिसरा मुलगा आनंदसाठी गर्भवती होत्या, त्यावेळी सासरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. याकाळात आशा ताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या बायोग्राफीत आशा ताई लिहितात, एक वेळ होती, जेव्हा मला आत्महत्या करावी असं वाटत होतं. मी आजारी होते, चार महिन्यांची गर्भवती होती. मी मानसिकदृष्ट्या तुटले होते. यात मी बाटलीभरून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. मात्र माझ्या मुलाचं माझ्यावरील प्रेम इतकं होतं की त्याने मला मरू दिलं नाही. या नात्यातून बाहेर पडल्यानंतर आशा भोसले यांनी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केलं. मात्र काही वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले.
मुलगा आणि मुलीच्या मृत्यूने आशाताई खचून गेल्या होत्या...
आशा यांच्या आयुष्यातील दु:ख संपता संपत नव्हतं. २००९ मध्ये आशा ताईंची मुलगी वर्षा भोसले हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. यातून ती बचावली. मात्र २०१२ मध्ये वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. वर्षा भोसले या नैराश्यात होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. वृत्तांनुसार, आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले यांचाही स्कॉटलँडमध्ये कर्करोगाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.