Isha Dey Wedding: आपल्या विनोदी टायमिंग आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे विवाहबंधनात अडकली आहे. ईशाने प्रसिद्ध गीतकार आणि लेखक अभिषेक खणकर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशाच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. अखेर बुधवारी (13 मार्च) या जोडीने पारंपरिक पद्धतीने विवाह करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.
ईशा डे आणि अभिषेक खणकरच्या पारंपरिक लुकने वेधले लक्ष
ईशा आणि अभिषेकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ईशाची सह-कलाकारांनी तिच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नासाठी ईशाने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती आणि पारंपरिक दागिने परिधान केले होते. विशेषतः ईशाच्या नथीने आणि तिच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर अभिषेकने मेंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करून एक परफेक्ट महाराष्ट्रीयन वर लुक कॅरी केला होता. एका फोटोमध्ये अभिषेक इशाला मंगळसूत्र घालताना दिसत असून हा क्षण चाहत्यांसाठी खूपच भावुक आणि सुखद होता.
कोण आहे ईशाचा पती अभिषेक खणकर?
ईशाचा पती अभिषेक खणकर हा मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत गीतकार आणि लेखक आहे. काही गाजलेल्या मालिकांची शीर्षकगीते (Title Songs) त्याने लिहिली आहेत. याशिवाय अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी लिहिली असून त्याच्या उत्कृष्ट लेखनासाठी त्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आले आहे. दोन दिवसांपूर्वीच ईशाने केळवण आणि मेंदी सोहळ्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.