मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची काळी बाजू सांगणारा न्या. हेमा समितीचा अहवाल नुकताच सार्वजनिक झाला आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर पीडित अभिनेत्रीनं पुढं येऊन तिचा कशा पद्धतीनं लैंगिक छळ करण्यात आला हा अनुभव NDTV ला सांगितला आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री मिनू मुनीरनं (Minu Muneer) सोमवारी प्रसिद्ध अभिनेत एम. मुकेश (M Mukesh ) आणि जयसूर्या (Jayasurya) यांनी चित्रपटाच्या सेटवर आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रपट दिग्दर्शक रणजीत आणि अभिमेता सिद्दकी यांना याच प्रकारचे आरोप झाल्यानंतर मल्याळम मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (AMMA) पदाचा रविवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिनूनं हा आरोप केला आहे.
मुकेश, मणियानपिल्ला राजू, इदावेला बाबू आणि जयसूर्या या चार अभिनेत्यानं 2013 साली एका चित्रपटाच्या सेटवर आपल्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केले, असा दावा अभिनेत्रीनं तिच्या फेसबुक पोस्टमधून केला आहे.
( वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
NDTV ला सांगितला अनुभव
मिनूनं NDTV शी बोलताना तिला शूटिंग दरम्यान आलेला भयंकर अनुभव सांगितला आहे. 'मी स्वच्छतागृहात गेले होते. मी तिथून बाहेर पडल्यानंतर जयसूर्यानं मला पाठीमागून मिठी मारली. त्यानं माझ्या संमतीशिवाय माझं चुंबन घेतलं. या प्रकारामुळे मला धक्का बसला. मी तिथून पळून गेले,' असं ती म्हणाली. 'माझ्यासोबत राहण्याची तयारी असेल तर तुला आणखी काम मिळेल,' असा प्रस्तावही जयसूर्यानं ठेवला होता, असा गौप्यस्फोट मिनूनं केला.
मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनचा सचिव इदावेला बाबूवरही मिनूनं आरोप केले आहेत. या असोसिएशनची सभासद होण्यासाठी मी अर्ज केला होता. त्यावेळी बाबूनं मला त्याच्या फ्लॅटवर बोलावलं आणि तिथं शारीरिक छळ केला असा आरोप मिनूनं केला.
( वाचा : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा )
अभिनेता आणि सत्तारुढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार अभिनेता मुकेशला सहकार्य करण्यासाठी नकार दिल्यानं त्यानं मला सदस्यत्व नाकारलं असा आरोपही मिनूनं केला.
'मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात शोषण होतं. मी त्याची साक्षीदार आणि बळी आहे. मी चेन्नईत का शिफ्ट झाले? हे मला कुणीही विचारलं नाही,' असा दावाही मिनूनं NDTV शी बोलताना केला.
'2013 साली माझा शारीरिक आणि शाब्दिक छळ करण्यात आला. मी त्यांना सहकार्य करुन काम करण्याचा प्रयत्न केला, पण तो छळ असह्य झाला. त्यामुळे मी मल्याळम इंडस्ट्री सोडून चेन्नईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला,' असंही मिनूनं स्पष्ट केलं.
मल्याळ अभिनेता मणियानपिल्ला राजूनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप करण्यामागे अनेक जणांचं कारस्थान आहे, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यानं केलीय. काही जण परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये निर्दोष आणि दोषी असे दोन्ही बाजूचे लोकं असू शकतात. त्यामुळे या आरोपांची सर्वसमावेशक चौकशी करावी, अशी मागणी राजूनं केली आहे.