Mamta Kulkarni: नव्वदच्या दशकात मादक सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कधी संन्यासिनीचे भगवे वस्त्र परिधान करून हिमालयाच्या कुशीत जाणारी, तर कधी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांमुळे वादात सापडलेली ममता आता एका वेगळ्याच अवतारात दिसली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तिने आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना अक्षरशः धक्का दिला असून, तिच्या या बदललेल्या रूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
भगव्या वस्त्राचा त्याग आणि हातात बिअर
प्रयागराजमध्ये गेल्या वर्षी झालेल्या महाकुंभात भगवी वस्त्रे परिधान करून संन्यास घेतल्याचे जाहीर करणारी ममता कुलकर्णी आता पूर्णपणे बदलली आहे. गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतानाच्या एका व्हिडिओमध्ये ती पाश्चात्य पोशाखात, डोळ्यांवर काळा चष्मा लावून मित्रांसोबत धम्माल करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे तिच्या समोरच्या टेबलवर बिअरचा ग्लासही दिसत असल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून, संन्यासाचा कंटाळा आला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
दोन दशकांनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर
ममता कुलकर्णी केवळ फिरण्यासाठीच नाही, तर तिच्या व्यावसायिक कामासाठीही चर्चेत आहे. तब्बल 25 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ती पुन्हा एकदा टेलिव्हिजनच्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
या पुनरागमनाबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी खूप उत्सुक आहे. गेल्या 25 वर्षांत मी कधीही टीव्हीवर दिसले नाही, पण आता पुन्हा एकदा हसण्याची आणि हसवण्याची संधी मिळत आहे. तिचे हे कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का मानला जात आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, पण सेटवर मात्र कलाकारांमध्ये भेदभाव, 'या' अनुभवाने सर्वच हादरले )
ममता कुलकर्णी सध्या "लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट" या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये तिच्यासोबत अंकिता लोखंडे, विकी जैन, अर्जुन बिजलानी, निया शर्मा आणि सुदेश लहरी यांसारखे प्रसिद्ध कलाकार आहेत.
भारती सिंह या शोचे सूत्रसंचालन करत असून शेफ हरपाल सिंह सोखी परीक्षकाची भूमिका निभावत आहेत. या शोच्या माध्यमातून ममताचा एक वेगळा आणि मजेशीर पैलू प्रेक्षकांसमोर येत आहे.
वाद आणि ग्लॅमरचे जुने नाते
ममता कुलकर्णीचे आयुष्य नेहमीच चढ-उतारांनी भरलेले आहे. 90 च्या दशकात तिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले, पण करिअरच्या शिखरावर असतानाच तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यानंतर तिचे नाव ड्रग डीलर विकी गोस्वामीसोबत जोडले गेले, ज्यामुळे ती मोठ्या वादात अडकली होती.
परदेशात वास्तव्य केल्यानंतर तिने भारतात पुनरागमन केले आणि थेट कुंभमेळ्यात संन्यासिनीच्या रूपात दर्शन देऊन सर्वांना थक्क केले होते.आता पुन्हा एकदा संन्यासाकडून ग्लॅमरकडे वळलेली ममता कुलकर्णी चर्चेचा विषय ठरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world